शेत नांगरत होतो आणि समोर पाहिले तर…

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी यवतमाळ : शेतात नांगरणी करताना अचानक ट्रॅक्टर समोर वाघ पाहताच चालकाने भयभीत होऊन गावाच्या दिशेने धूम ठोकली. या प्रकाराने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मुरझडी लाल शेतशिवारात वडगाव (पो.स्टे) येथील रमेश चौधरी यांच्या शेतात सरपंच चेतन सातपुते यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरने चालक शंकर मरसकोल्हे व त्याचा एक सहकारी नांगरणी करीत होते. तेव्हा अचानक शंभर मीटर अंतरावर वाघ दिसल्याने ते भयभीत झाले. वाघाला पाहून त्यांची घाबरगुंडी उडाली. लगेच ट्रॅक्टर घेऊन त्यानी गावाकडे धूम ठोकली. घडलेली हकीकत सरपंच व गावातील नागरिकांना सांगितली.

या प्रकाराची माहिती वनविभाग प्रादेशिक कार्यालय वडगाव यांना रात्रीच देण्यात आली. आठ दिवसांपूर्वी जंगलात शेळ्या व गुरे चारणारे गुराखी यांना डरकाळी फोडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे ते आठ दिवसांपासून जंगलात आपली जनावरे चारायला नेत नव्हते. पण प्रत्यक्षात वाघ दिसला नव्हता. वनरक्षक शेळके यांनी सरपंच चेतन सातपुते यांना सोबत घेऊन गस्त घातली असता शेततळ्यात पाऊलखुणा आढळून आल्या होत्या. शुक्रवारी १९ एप्रिल रोजी ट्रॅक्टर चालकाला प्रत्यक्ष डोळ्यासमोर वाघ दिसल्याने वडगावसह मुरझडी, गणेशपूर येथील नागरिक कमालीचे भयभीत झाले आहे. परिसरात वाघ आल्याची चर्चा सुरू आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *