रुग्णवाहिकेतच दिला बाळाला जन्म

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्याची आपत्कालीन आरोग्य सेवा आणि १०८ रुग्णवाहिकेने ‘जीवनवाहिनी’ म्हणून मिळालेली उपाधी सार्थकी लावली आहे. धावत्या रुग्णवाहिकेत एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. भंडारा जिल्हा रुग्णालयातून नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) रेफर केलेल्या या गर्भवती महिलेने अत्यंत गंभीर परिस्थितीत रुग्णवाहिकेतच बाळाला यशस्वीरित्या जन्म दिला. उच्च रक्तदाबाने ग्रस्त असलेल्या आई आणि नवजात बाळाचे प्राण डॉक्टर आणि रुग्णवाहिका चालकाच्या तत्परतेने वाचले. मोठ्या हिमतीने धावत्या रुग्णवाहिकेत गर्भवती महिलेची सुखरुप प्रसूती करून तिची वेदनेतून सुटका केली.

सविस्तर वृत्त असे की, रविवार, १४डिसेंबर रोजी, ३१ वर्षीय सुषमा भरत ठोंबरे यांना प्रसूती कळा सुरू झाल्या मात्र प्रसूतीपूर्व गुंतागुंतीमुळे त्यांना नागपूरला नेणे आवश्यक होते. उपजिल्हा साकोली येथून १०८ रुग्णवाहिका क्रमांक एम एच १४ /सी एल १०८९ दुपारी ४ वाजताच्या दरम्यान प्रसूती वेदनेने विव्हळत असलेल्या गर्भवतीला घेऊन निघाली. रुग्णवाहिकेत डॉ. निहाल पारधी आणि चालक नितीन ठाकरे होते.

नागपूरकडे जातअसताना सुषमा ठोंबरे यांना अचानक प्रसव वेदना जाणवू लागल्या. त्यांचा रक्तदाब वाढला, ज्यामुळे परिस्थिती जीवघेणी बनली. डॉ. निहाल पारधी यांना हे लक्षात आले की रुग्णालयात पोहोचणे अशक्य आहे आणि क्षणभरही उशीर होणे धोकादायक ठरू शकते. विलंब न करता, त्यांनी रुग्णवाहिकेच्या मर्यादित सुविधांमध्ये आवश्यक सहाय्य आणि वैद्यकीय कौशल्याचा वापर करून अत्यंत असुरक्षित परिस्थितीत महिलेवर यशस्वी नैसर्गिक प्रसूती केली. संध्याकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान महिलेची सुखरूपरीत्या प्रसुती झाली. डॉ. पारधी आणि चालक नितीन ठाकरे यांच्या जलद निर्णयक्षमतेचे आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *