ट्रकची खांबाला धडक लागून २२ घरांची विद्युत उपकरणे जळून खाक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील गिरोला येथील न्यू आशीर्वाद नगर परिसरात एका ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे विद्युत खांबाला भीषण धडक बसली. या धडकेमुळे झालेल्या मोठ्या स्फोटात परिसरातील सुमारे २२ हून अधिक कुटुंबांची लाखो रुपयांची विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहेत. ही घटना २६ मार्च रोजी दुपारी १२:५५ च्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, साहिल दलीराम चौधरी हा चालक त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र. एमएच ४० बीजी ७२३० ) घेऊन आशीर्वाद नगर भागातून जात असताना त्याने विद्युत प्रवाह असलेल्या खांबाला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, परिसरात मोठा स्फोट झाला आणि उच्च दाबाचा विद्युत प्रवाह घराघरांमध्ये शिरला.

यामुळे नागरिकांच्या घरातील फ्रीज, टीव्ही, ए.सी., वॉशिंग मशीन, सीसीटीव्ही कॅमेरे, आरो वॉटर प्युरिफायर, वाय फाय राऊटर, मोबाईल चार्जर आणि पंखे यांसारखी महागडी उपकरणे क्षणात जळून निकामी झाली. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी जेव्हा ट्रक चालक साहिल चौधरी याला नुकसान भरपाईबाबत जाब विचारला, तेव्हा त्याने आपली चूक मान्य करण्याऐवजी रहिवाशांशी हुज्जत घातली. “तुमच्याने जे होते ते करा, मी कुणाला घाबरत नाही,” असे म्हणत त्याने नागरिकांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. चालकाच्या या उद्धट वर्तनामुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. नुकसान झालेल्या नागरिकांमध्ये प्रामुख्याने सुनील कुरंजेकर (कॅमेरे, टीव्ही), विजय सेलोकर (फ्रीज), भोजाराम पाथोडे (इलेक्ट्रिक घड्याळ), विनोद शिष्ठे (फ्रीज, टीव्ही), श्यामकला कोडवते (ए.सी.), राजकुमार सहारे (ए.सी., टीव्ही), चंचल विश्वास (टीव्ही), विलास चंद्रिकापुरे (वैशिंग मशीन ), सुदर्शन उजवणे (फ्रीज, मीटर), संजय वंजारी (ए.सी., वॉशिंग मशीन) यांच्यासह अशोक नारनवरे, चुन्नीलाल टेंभूने, अविनाश कानेकर, हुवेश शेख, शकील शेख, ज्ञानेश्वर मारबते, अश्लील शेख, शैलेश आगाशे, संजय वंजारी, कार्तिक सहारे, नरेंद्र चोपकर, सुनील खापरकर, सचिन नखाते निलेश कळपाते यांच्या उपकरणांचा समावेश आहे.

घटनेनंतर महावितरणच्या कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्युत पुरवठा सुरळीत केला असला तरी, नागरिकांचे वैयक्तिक मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी गिरोला येथील रहिवाशांनी मानेगाव येथील महावितरणच्या उपअभियंत्यांना लेखी निवेदन सादर केले आहे. संबंधित ट्रक जप्त करून दोषी चालकावर कडक कारवाई करावी आणि गरिबांचे झालेले नुकसान भरून द्यावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आता यावर महावितरण आणि पोलीस प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *