
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) येथील प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वत:च्या व पत्नीच्या नावे खासगी कंपन्या स्थापन केल्या आणि कोट्यवधी रुपयांचा निधी हडपल्याचा खळबळजनक आरोप ओबीसी क्रांती मोर्चाने केला आहे. याप्रकरणी शिरसाठे यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. निवेदनानुसार, कुणाल शिरसाठे यांनी पदावर असताना ‘महास्किल टेक इनोव्हेटिव्ह फाउंडेशन’ आणि ‘ईझी रूट एक्झिम’ यांसारख्या खासगी कंपन्यांच्या माध्यमातून शासकीय कंत्राटे लाटली.
या भ्रष्टाचारात त्यांना तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांचेही संगनमत लाभल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे खासगी व्यवसाय करणे हे सेवाशर्तीचे गंभीर उल्लंघन असून, या रॅकेटच्या माध्यमातून कोटयवधी रुपयांच्या निधीचा अपहार करण्यात आल्याचे पुरावेही सादर करण्यात आले आहेत. संजय मते यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने या प्रकरणाची मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि ओबीसी कल्याण विभागामार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिरसाठे यांची अवैध मालमत्ता जप्त करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देतांना संजय मते, सुरेश खंगार, शोभा बावणकर, एन. के. राजपूत, रामटेके, मनीषा भांडारकर, एन. के. राजपूत, पुरुषोत्तम नंदुरकर, पूजा पाटील, अनुष्का पाटील, हर्षिला कराडे, कुमुद गजघाटे, कोमल दुबे, यशवंत सूर्यवंशी, अमित मेहर, सुभाष उके, दिगंबर रामटेके, प्रकाश बांते, भाऊ कातोरे, अभिषेक, कोमल, प्रकाश मुटकुरे, युवराज नंदनवार, संजय बांते, अतुल राघोर्ते आदींचा समावेश होता.