
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : इंदोरा खुर्द परिसरातील अनेक जनावरांची शिकार करून येथील नववर्षीय बालिकेचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या अजून पर्यंत या परिसरात फिरत असल्याने परिसरातील शेतकरी, नागरिक व विद्यार्थ्यांचे जीविताला धोका निर्माण झाला आहे.करीता या नरभक्षक बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावे अशी मागणी शेतकरी व शेतमजूर संघटना, शोकाकुल परिवार व इंदोरा खुर्द वासीयांनी केली आहे. तिरोडा तालुक्यातील इंदुरा खुर्द परिसरात मागील दीड दोन महिन्यापासून वावरत असलेल्या बिबट्याने अनेक शेळ्या मेंढ्याची शिकार केली असून २९ नोव्हेंबर २०२५ रोजी कुमारी रुची देवानंद पारधी या बालिकेवर हत्या करून जीव घेतला तसेच त्यानंतर हा बिबट्या याच परिसरात वावरत असून दिवसाढवळ्या ही नागरिकांच्या नजरेस पडत असल्याने शेतकरी शेतमजूर, विद्यार्थी व नागरिकांच्या जिवाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.करीता वन विभागातर्फे या बिबट्याचा बंदोबस्त करुन नागरिकांची भीती दूर करावी अशी मागणी शेतकरी व शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष नितेश खोब्रागडे , मृत मुलीचे वडील देवानंद पारधी इंदोरा खुर्दवासी व परिसरातील नागरिकांनी २२ डिसेंबर रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी तिरोडा यांना निवेदन दिले असून निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन मंत्री गणेश नाईक व संबंधित विभागांना दिले आहे.