
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- रस्त्यांवरील वाढते अपघात रोखण्यासाठी आणि वाहन चालकांमध्ये शिस्त लागावी यासाठी केवळ दंड आकारणे हाच पर्याय नसून, नियमांचे पालन करणाºयांना प्रोत्साहित करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज, १४ जानेवारी रोजी गोंदिया वाहतूक विभाग आणि नायरा एनर्जी यांच्या संयुक्त विद्यमाने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. शहरातील गायत्री मंदिर चौक, कुडवा येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करणाºया, हेल्मेट परिधान करणाºया आणिसीटबेल्ट लावणाºया वाहन चालकांना थांबवून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
अचानक पोलिसांनी थांबवल्या मुळे सुरुवातीला काही चालक गोंधळले, मात्र कौतुक होत असल्याचे समजताच त्यांच्या चेहºयावर समाधान दिसून आले. जन जागृतीवर भर वाहतूक विभागाने यावेळी स्पष्ट केले की, रस्ते सुरक्षा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. नियमांचे पालन करणाºयांचा सन्मान केल्यामुळे इतर नागरिकांनाही शिस्त पाळण्याची प्रेरणा मिळेल, या हेतूने नायरा एनर्जीच्या सहकायार्ने हा उपक्रम राबवण्यात आला. मान्यवरांची उपस्थिती या मोहिमेदरम्यान गोंदिया वाहतूक विभागाचे अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच नायरा एनर्जीचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे शहरात सर्वत्र कौतुक होत असून, अशा सकारात्मक उपक्रमांमुळे पोलीस आणि जनता यांच्यातील समन्वय वाढण्यास मदत होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.