साकोली नगर परिषदेत भाजपाचा वरचष्मा कायम

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : नगरपरिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर साकोलीच्या स्थानिक राजकारणात खरी रंगत निर्माण झाली असून आज, गुरुवार १६ जानेवारी रोजी झालेल्या नगरपरिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष पदाची व दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. सत्तासमीकरण, इच्छुकांची मोचेर्बांधणी, पक्षांतर्गत हालचाली आणि वरिष्ठ पातळीवर सुरू असलेल्या गुप्त रणनीती यामुळे ही सभा केवळ औपचारिक न राहता चांगलीच राजकीय थरारक ठरली. उपाध्यक्षपदी भाजपाच्या रोहिणी मुंगुलमारे यांनी विजय मिळवत भाजपाचे संख्याबळ पुन्हा अधोरेखित केले. आजच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष पदासाठी भाजपाकडून रोहिणी मुंगुलमारे तर काँग्रेसकडून संदीप बावनकुळे यांच्यात थेट लढत झाली. मतदान प्रक्रियेत रोहिणी मुंगुलमारे यांना १२ मते मिळाली, तर संदीप बावनकुळे यांना ७ मते पडली.

दोन नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतल्याने सभागृहातील राजकीय हालचालींना आणखी चुरस आली. अखेर स्पष्ट बहुमताच्या जोरावर रोहिणी मुंगुलमारे उपाध्यक्षपदी विजयी झाल्या. दरम्यान, नगरपरिषदेच्या दोन स्वीकृत सदस्य पदांसाठीही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. या निवडीत भाजपाकडून नितीन खेडीकर तर काँग्रेसकडून अ‍ॅड. दिलीप कातोरे यांची स्वीकृत सदस्यपदी वर्णी लागली. त्यामुळे स्वीकृत सदस्यांमध्ये दोन्ही प्रमुख पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले. या निवडणुकीनंतर साकोली नगरपरिषदेतील सत्तासमीकरण अधिक ठळक झाले असून भाजपाचा वरचष्मा कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उपाध्यक्ष निवडीनंतर राजकीय वतुर्ळात चर्चांना उधाण आले असून येत्या काळात नगरपरिषदेत विकासकामे, निर्णयप्रक्रिया आणि राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *