
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गोसीखुर्द धरणात १०० टक्के पाण्याची साठवणूक अंतिम टप्प्यात असून वैनगंगा नदीवरील पाण्याची पातळी वाढल्याने कारधा येथिल जुन्या पुलाला पाण्याने स्पर्श केल्याने केवळ नदीवर पुलच शिल्लक दिसत आहे. मात्र असे असतांनाही या ब्रिटीशकालीन वैनगंगेच्या पुलावरुन परीसरातील व खेडेगावातील सायकलस्वारांचा व दुचाकीस्वारांचा तसेच पायी जाणाºयांचा जीवघेणा प्रवास सुरुच आहे. याकडे प्रशासनाने लक्ष घालून सदर पुलावरील वाहतूक ताबडतोब थांबवावी अशी मागणी होत आहे.
भंडाºयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग आपत्कालीन परिस्थितीतच नव्हे तर आपत्ती येण्यापूर्वीच नागरिकांना सजग करण्याचे काम करत आहे. दहा वर्षांपूर्वीपासून कारधा येथील वैनगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावरून आवागमन करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मात्र अजूनही या धोकादायक पुलावरून नागरिकांचे आवागमन सुरूच आहे. गोसीखुर्द प्रकल्पाने अंतिम पातळी गाठल्याने वैनगंगेवरील जुन्या पुलाला पाणी स्पर्श करायला लागली आहे. अशावेळी भविष्यात धोका झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वैनगंगा नदीवरील ९० वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन कारधा पुल धोकादायक अवस्थेत असून या पुलाची कालमर्यादा संपली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या पुलावरून वाहतुकीस निर्बंध घातले आहेत. वैनगंगा नदीवरील कारधा येथे असलेला जुना पूल अनेक वर्षांपासून सेवा देत आहे. काळाच्या ओघात हे ९० वर्षीय पुल निवृत्तीच्या अवस्थेत येऊन ठेपला असला तरी लोकांच्या अपेक्षा त्याच्याकडून कायमआहेत.
अनेक पूर या पूलाने झेलले. अनेकदा पुराखाली गेलेला हा पूल पुन्हा नव्याने उभा राहून वाहनांचा आणि लोकांचा भार सहन करण्यासाठी सज्ज होतो. परंतु प्रत्यक्षात या पुलाचे आयुष्य प्रशासनाच्या लेखी संपले आहे. पुलाला संभाव्य धोका होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने २०१६ सालीच पूल बंद करण्यासंदर्भात सूचना निर्मित केली. प्रशासनाकडून लोखंडी अडथळे लावून पूल बंदही करण्यात आला. मात्र त्यानंतरही राजकीय दबाव आणि अन्य कारणाने पूल वाहतूकीसाठी सुरु केला गेला. अनेकदा नागरिकांनी स्वत: हे अडथळे तोडून या धोकादायक प्रवासाला सुरुवात केली आहे. आजही या पुलावरून वाहतूक सुरू आहे. यामध्ये सायकलस्वार, दुचाकीस्वार व पायदळ जाणाºयांचा नित्याचाच आवागमण सुरु आहे. सध्या गोसीखुर्द प्रकल्प त्याच्या पूर्ण क्षमतेने म्हणजे २४५.५०० मीटरने भरला आहे.
परिणामी प्रकल्पाचे बॅक वॉटर प्रचंड वाढले आहे. कारधा येथील वैनगंगा नदीचे पात्र तुडुंब भरले असून पाणी लहान पूलाला स्पर्श करून आहे. अशावेळी कोणताही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास याला जबाबदार कोण हा प्रश्न पडतो. प्रशासनाने अधिकृतरित्या पूल बंद करण्याची सूचना दहा वर्षांपूर्वीच काढली आहे. त्यामुळे विपरीत घडल्यास प्रशासनाकडे बोट दाखविण्याची जागा उरणार नाही. त्यामुळे नागरिकांनीच स्वत:ची काळजी घेऊन दुर्घटनेला आमंत्रण देऊ नये आणि प्रशासनानेही सुरू असलेली वाहतूक सक्तीने बंद करावी, हा त्यावरील मार्ग असू शकतो. वैनगंगा नदीवरील लहान पूल ब्रिटिशांनी १९२९ मध्ये बांधला होता. या पुलाची वयोमर्यादा संपत आल्याने त्याच्या बाजूलाच नवीन पूल बांधण्यात आला. सध्या राष्ट्रीय महामार्गावरील जड वाहतूक नवीन पुलावरून सुरू आहे. परंतु, नवीन पूल तयार झाला तरी आजही लोक रात्रीच्या वेळी या पुलावरून छुप्या रितीने वाहतूक करीत आहेत. ७ वर्षांपूर्वीपासून जिल्हाधिकारी यांनी या पुलावरून वाहतुकीस मनाई असल्याबाबत अधिसूचना फलक लावले आहे. मात्र तरीही आजही या पुलावरून छुप्या मार्गाने वाहतूक केली जाते.