
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील काही खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापकांवर आर्थिक व मानसिक दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकारांबाबत भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाने चिंता व्यक्त केली आहे. काही संस्थाचालक मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यासोबत मनमानी करीत आहेत. अशा अन्यायग्रस्त मुख्याध्यापकांसोबत नेहमीच मुख्याध्यापक संघ त्यांच्या पाठीशी राहील असा निर्णय सभेत घेण्यात आला. मोहाडी तालुक्यातील एका संस्थाचालकाने तर क्रौयार्ची परिसीमा गाठली आहे. संबंधित शाळेतील शिक्षकांकडून दरमहा ५० हजार रुपयांहून अधिक रक्कम हप्त्याच्या नावाखाली घेतली जात आहे. शाळेचा संपूर्ण खर्चही शिक्षकांनाच करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी चारचाकी बसची व्यवस्था करण्याचे पैसेही शिक्षकांकडूनच वसूल केले जात आहेत. इतके करूनही संस्थाचालकाचे समाधान न झाल्याने शिक्षकांना शाळेच्या इमारतीचे बांधकाम करून देण्याचा दबाव टाकण्यात येत आहे. तसेच त्या शाळेतील मुख्याध्यापकांना सभेतून मुक्त करण्याच्या दम दिला जात आहे. त्यामुळे त्या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक मानसिक तणावाखाली आहेत.
या छळामुळे संबंधित मुख्याध्यापकाने मानसिक ताण घेतल्याचे प्रकारही समोर आले असून, ही बाब अत्यंत गंभीर आहे. शिक्षकच सुरक्षित नसतील तर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या गंभीर प्रश्नावर भंडारा जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशनची सभा भंडारा येथील विश्रामगृहात घेण्यात आली. सभेला मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजकुमार बालपांडे, सचिव राजू बांते, रेखा भेंडारकर, कुंदा गोडबोले, प्रमोद धार्मिक, विपीनचंद्र रायपूरकर, राधेश्याम धोटे, विष्णुदास जगनाडे, सुनील घोल्लर, सेवक मने आदींची उपस्थिती होती. यावेळी विदर्भ मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारणीत समावेश झालेले राजकुमार बालपांडे, प्रमोद धार्मिक, विपीनचंद्र रायपूरकर, रेखा भेंडारकर, अर्चना बावणे यांचा सत्कार करण्यात आला.