
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर :- तुमसर नगर परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक दि. २७ जानेवारी २०२६ रोजी नियोजित असून ही निवडणूक नियमबद्ध, शांततामय व पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याची स्पष्ट भूमिका नगराध्यक्ष सागर गभने यांनी मांडली. रविवारी नगर परिषद कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नगराध्यक्ष गभने यांनी सांगितले की, ही निवडणूक पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी उपेश अंबादे यांच्या देखरेखीखाली आणि प्रशासनाच्या नियंत्रणात पार पडणार आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांनी किंवा सदस्यांनी कोणताही संभ्रम ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी स्वीकृत सदस्याबाबतही भूमिका स्पष्ट करत सांगितले की, स्वीकृत सदस्यांची निवड पूर्णत: नियमांनुसारच करण्यात आली आहे. तसेच स्वीकृत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याबाबत कोणताही अधिकृत आदेश नसल्याचे त्यांनी नमूद केले.
सदर प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात दाखल असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहितीही त्यांनी दिली. ‘न्यायालय जो निर्णय देईल, तो मला आणि सर्व जनतेला मान्य राहील,’ असेही नगराध्यक्ष गभने यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून नगर परिषदेच्या कामकाजासंदर्भात विविध चर्चा व बातम्या सुरू असून काही अपूर्ण माहितीमुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. ह्लसभापती निवडणुकीच्या प्रक्रियेत माझा कोणताही वैयक्तिक इंटरेस्ट नाही. ही निवडणूक पूर्णत: लोकशाही पद्धतीने, सदस्यांच्या मतानुसारच होईल,असे त्यांनी ठामपणे नमूद केले.तसेच नागरिकांनी अफवा, अपूर्ण माहिती व गैरसमज पसरवणाºया चर्चांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करत निवडणूक प्रक्रियेत शांतता, नियमपालन आणि पारदर्शकता राखणे हे सर्वांचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, माध्यमांनाही त्यांनी विनंती केली की, वस्तुनिष्ठ आणि अधिकृत माहितीच्या आधारेच बातम्या प्रसिद्ध कराव्यात, जेणेकरून जनतेमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही.