
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी बारामती : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात दुदैवी निधन झाले. बारामती विमानतळाजवळ लँडिंग करताना तांत्रिक अडचणींमुळे विमान कोसळले आणि त्यात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या बातमीनंतर राज्यभरात खळबळ उडाली असून अनेक नेते तातडीने बारामतीकडे रवाना झाले आहेत. अजित पवार आज बारामती दौºयावर होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ त्यांच्या सभांचा कार्यक्रम आखला होता. मात्र मुंबई ते बारामतीचा ४० मिनिटांचा प्रवास त्यांचा अखेरचा ठरला. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी मुंबईहून टेक आॅफ केले होते आणि बारामती विमानतळाजवळ पोहोचताच अपघात घडला.
पायलटने लँडिंग सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला, पण अखेरच्या क्षणी विमानावर नियंत्रण सुटल्यामुळे विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर कोसळले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या क्षणी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता आहे. प्राथमिक अंदाजानुसार, इंजिनमध्ये समस्या किंवाविमानाचा नियंत्रण सुटल्यामुळे दुर्घटना झाली असावी, असे दिसते. या अपघाताचे नेमके कारण ब्लॅक बॉक्स तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. सर्व जखमींना तातडीने बारामतीतील रुग्णालयात दाखल केले गेले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तपास यंत्रणा अद्याप विमान अपघाताचे संपूर्ण कारण स्पष्ट करत आहे. ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतरच विमानाचे उड्डाणापासून शेवटच्या क्षणापर्यंतचा डेटा आणि पायलट-क्रू संवाद तपासून नेमके कारण समोर येईल.
या अपघातामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक धक्कादायक क्षण निर्माण झाला आहे, कारण अजित पवार हे राज्यातील सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले नेते आणि कार्यक्षम प्रशासक म्हणून ओळखले जात होते. अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दु:खद घटनेमुळे आज, बुधवार २८ जानेवारी २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात राज्य सरकारची सर्व कार्यालये बंद करण्यात आली असुन अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, दिवंगत उपमुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि शोक व्यक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, २८ ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यभर तीन दिवसांचा राज्य शोक पाळण्यात येणार आहे. या काळात सर्व शासकीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार असून कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम होणार नाहीत.