
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सुरु झालेल्या अनेक महत्वाकांक्षी योजनांचा राज्य सरकारने बंदीचा निर्णय घेतला होता. ‘माझी शाळा’, ‘आनंददायी शाळा’, ‘आनंदाचा शिधा’ यांसारख्या योजनांवर बंदी घालण्यात आल्याने महायुतीतील आलबेल नसल्याच्या चर्चांना गती मिळाली होती. काही आरोप हे सुद्धा केले जातात की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजकीय स्थितीला कोंडी करण्यासाठी या योजना बंद केल्या गेल्या. अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री असताना सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’वर ब्रेक लागल्याची चर्चा उभी राहिली आहे.
ही योजना सुरुवातीपासूनच ज्येष्ठ नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरली होती आणि मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. मात्र आता या योजनेतील अर्जांवर प्रलंबित स्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अर्ज मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. जालना जिल्ह्यातील उदाहरण पाहता, ५७२२ अर्जांपैकी फक्त ९२९ अर्जांना मंजुरी मिळाली आहे, तर उर्वरित ४७९३ अर्ज अद्याप प्रलंबित किंवा छाननीच्या प्रक्रियेत आहेत. अर्ज मंजूर झालेले १२३९ लाभार्थी कधी तीर्थयात्रेसाठी बोलावले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशीच परिस्थिती राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्येही आहे. यामुळे या योजनेला ब्रेक लागल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. सध्या राज्याचे अर्थसंकल्प सुरू असुन त्यामध्ये हा मुद्दा चर्चेला येण्याची शक्यता आहे.