
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : महावितरणने नागपूर प्रादेशिक विभागासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. कंपनीच्या नागपूर शहर चाचणी विभागा अंतर्गत नवनिर्मित अत्याधुनिक चाचणी प्रयोगशाळेचा मानकापूर, नागपूर येथे महावितरणचे संचालक (संचलन) सचिन तालेवार यांच्या शुभहस्ते नुकताच थाटात शुभारंभ करण्यात आला. ही प्रयोगशाळा महावितरणच्या पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, या प्रयोगशाळेच्या यशस्वी कार्यान्वयासाठी प्रादेशिक संचालक परेश भागवत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
या चाचणी प्रयोगशाळेमुळे आता संपूर्ण विदर्भातील वीज उपकरणे आणि रोहीत्रांच्या चाचणी प्रक्रियेला नवी दिशा मिळणार असल्याचे मनोगत संचालक सचिन तालेवार यांनी व्यक्त केले. या प्रयोगशाळेत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील पाचही परिमंडलांतील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती आणि अकोला परिमंडलातील सीटी-पीटी आणि वितरण रोहित्रांसह वीज वितरण यंत्रणेतील इतरही महत्त्वपूर्ण उपकरणांची चाचणी एकाच ठिकाणी करणे शक्य होणार आहे.

या प्रयोगशाळेमुळे या उपकरणांची चाचणी प्रक्रिया अधिक जलद, कार्यक्षम आणि विश्वसनीय होईल, ज्यामुळे महावितरणचे कर्मचारी आणि विदर्भातील वीज ग्राहक या दोघांनाही मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचेही तालेवार यांनी यावेळि सांगितले. विदर्भातील पहिलीच विशेष प्रयोगशाळा: विशेष म्हणजे, अशा प्रकारची अत्याधुनिक आणि एकात्मिक चाचणी प्रयोगशाळा नागपूर परिक्षेत्रातील पहिलीच आहे. या सुविधेमुळे वीज पुरवठ्याची गुणवत्ता आणि सातत्य टिकवून ठेवण्यास महावितरणला मोठी मदत होईल. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता (चाचणी) मनीष वाट, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, मुख्य अभियंता (स्थापत्य) राकेश जनबंधू, अधीक्षक अभियंता वैभव पाथोडे, नागपूर शहर मंडलचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, नागपूर ग्रामिण मंडलचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, आणि नागपूर शहर चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता चंदन तल्लारवार यांच्यासह अनेक कार्यकारी अभियंते, अधिकारी, अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केबल फॉल्ट डिटेक्शन व्हॅन सुविधा उपलब्ध: महावितरणच्या नागपूर शहर चाचणी विभागाच्या ताफ्यात नवीन केबल फॉल्ट डिटेक्शन व्हॅनचा समावेश करण्यातआला. या नवीन वाहनाचा शुभारंभ नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते मंगळवारी (दि.३) करण्यात आला. भूमिगत केबल्सच्या जाळ्यामुळे बिघाड शोधणे हे मोठे आव्हान होते. मात्र, या डिटेक्शन व्हॅनमुळे कामात पारदर्शकता आणि वेग येणार आहे.
पावसाळ्यात जेव्हा शॉर्ट सर्किटच्या घटना वाढतात, तेव्हा ही व्हॅन सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेली ही व्हॅन जमिनीखालील दोष (ऋं४’३) अचूकपणे शोधून काढत असल्याने दुरुस्तीच्या कामाला मोठी गती मिळणार असल्याचे दिलीप दोडके यांनी याप्रसंगी सांगितले. या कार्यक्रमाला चाचणी प्रविभागाचे अधीक्षक अभियंता वैभव पाथोडे, नागपूर शहर चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता चंदन तल्लारवार, शहर चाचणी विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड, सिव्हील लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता धम्मदिप फुलझेले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रविण बिसेन यांच्यासह अभियंते व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.