
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भ्रष्टाचाराचा शिरकाव न झालेले एकही क्षेत्र राहिले नाही. अस्सल मातीतील असलेल्या कबड्डी खेळालाही भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले असून स्पर्धा न खेळलेल्या खेळाडूंना लाखो रुपयात प्रमाणपत्र विकून कबड्डीचा बाजार माडल्याचे पुढे आले आहे. माजी आमदार आणि नागपूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश व्यास यांनी आज भंडारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत कबड्डी तील प्रमाणपत्र विक्रीच्या गोंधळाचे पितळ उघडे केले आहे.
जुन्या विदर्भ कबड्डी असोसिएशन या संघटनेचे सदस्य व नागपूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष असलेल्या माजी आ. गिरीश व्यास, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे सहसचिव असलेल्या हर्जिंदर सिंग सौखी व अन्यायग्रस्त खेळाडूंनी कबड्डी खेळातील भ्रष्टाचार उजागर केला. सुरुवातीला विदर्भ कबड्डी असोसिएशन ही एकमेव दोन्ही संघटना होती. जितेंद्र ठाकूर यांनी विदर्भ मेच्यूअर कबड्डी फेडरेशन नावाने नवीन बोगस संघटना स्थापन केली. या माध्यमातून नॅशनल फेडरेशनला सलग्नित होऊन आपल्या संस्थेला मान्यता मिळवून घेतली. या संस्थेच्या माध्यमातून भ्रष्टाचाराचे कुरण ठाकूर व त्यांच्या सहकाºयांनी उघडल्याचे गिरीश व्यास म्हणाले.
बोगस प्रमाणपत्र देणे, प्रमाणपत्राची विक्री, न खेळणाºया खेळाडूंना लाखो रुपये घेऊन प्रमाणपत्र देण्याचे काम सध्या सुरू असल्याचे ते म्हणाले. असाच एक प्रकार भंडारा जिल्ह्यातही उघडकीस आला असून जे खेळाडू स्पर्धा खेळले, त्यांना प्रमाणपत्र न देता, न खेळणाºयांना प्रमाणपत्र दिले गेले.७२ सीनियर कबड्डी स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशा येथे खेळवली गेली. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत झालेल्या स्पर्धेत गोंदिया १२ पैकी तीन खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले नाही. शुभम मेंढे, गौरव राऊत, विजय मरस्कोले या खेळाडूंचे प्रमाणपत्र जे खेळाडूखेळलेच नाही त्या अन्य जिल्ह्यातील राजन सव्वाके, रवी भुसारी आणि कुंदन सम्राट यांना देण्यात आल्याचा आरोप व्यास यांनी केला. यावेळी गोंदियाच्या खेळाडूंनी तक्रार केली त्यावेळी त्यांना भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे झालेल्या स्पर्धेत खेळण्याची संधी दिली गेली. गोंदिया जिल्ह्यातील खेळाडू भंडारा जिल्ह्यातून खेळल्याने भंडारा जिल्ह्यातील अनिकेत वैद्य आणिरोशन कांबळे या दोन खेळाडूंवर अन्याय होऊन ते प्रमाणपत्रापासून वंचित राहिले आहेत.
जितेंद्र ठाकूर हे स्वत: एका जिल्ह्यातील खेळाडू दुसºया जिल्ह्यातून खेळू नये यासाठी भंडाºयात गोंदियाच्या खेळाडूंना खेळून भ्रष्टाचार करण्यास वाट मोकळी करून दिल्याचा आरोप व्यास यांनी केला. गोंदियाच्या खेळाडूंचे प्रमाणपत्र लाखो रुपयात ठाकूर आणि त्यांच्या सहकाºयांनी विकले. हा भ्रष्टाचार उघड व्हावा यासाठी आम्ही तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. या तक्रारीवर गुन्हा दाखल केला दावा, ज्यांना बोगस प्रमाणपत्र दिली आणि त्या आधारावर नोकरी किंवा कुठेही अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला असेल तर तो रद्द करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी गिरीश व्यास यांच्यासह सोखी आणि उपस्थित खेळाडूंनी केला आहे. पत्रकार परिषदेला विदर्भ कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.