
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना संसद कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे. हा निर्णय लोकशाही मूल्यांना धरून नसून अन्यायकारक असल्याचा आरोप करीत भंडारा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले. दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विरोधकांच्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली.
ही कारवाई म्हणजे लोकप्रतिनिधींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. भंडारा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धनराज साठवणे यांनी तीव्र शब्दांत या निलंबनाचा निषेध नोंदवला. ते म्हणाले की, ‘डॉ. प्रशांत पडोळे हे जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी संसदेत आवाज उठवत आले आहेत. लोकशाही मार्गाने दिलेल्या घोषणांबद्दल निलंबन करणे ही हुकूमशाही वृत्ती दर्शवते. सत्ताधाºयांना विरोध सहन होत नसेल, तर तेलोकशाहीसाठी धोकादायक आहे.’ निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संसद ही चर्चेचे व मतभिन्नतेचे सर्वोच्च व्यासपीठ आहे.
विरोधी पक्षातील खासदारांना बोलू न देणे, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणे हे संविधानाच्या भावनेला धरून नाही. त्यामुळे डॉ. प्रशांत पडोळे यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्यात यावे, अशी स्पष्ट मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकाºयांनी ‘लोकशाही वाचवा’, ‘विरोधकांचा आवाज दाबू नका’ अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. हा लढा केवळ एका खासदाराचा नसून, संपूर्ण देशातील लोकशाही मूल्यांचा असल्याचेही काँग्रेसने स्पष्ट केले आहे. यावेळी अभिजीत वंजारी,शंकर तेलमासरे, गजानन बादशाह,शेख नवाब पटेल,किशोर राऊत,प्रमोद मानापुरे, लखणलाल चौरे,भगवान राऊत, जयश्री मेश्राम,नरेशचंद्र कावळे, पवन वंजारी,उमेश मोहतुरे, गिरीश रहांगडाले,मार्तंड बडोले, जीवन भजनकर, विनीत देशपांडे, अमित हूमने,रतन मेश्राम, व कार्यकर्ते उपस्थित होते.