
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना अन्य ऐतिहासिक व्यक्तीशी केल्याच्या निषेधार्थ भंडारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सोमवार १६ फेब्रुवारी रोजी भंडारा शहरातील गांधी चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांचा निषेध करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. टीपू सुलतान यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक हिंदूंवर अत्याचार केले, सक्तीची धर्मांतरे घडवून आणली तसेच अनेक निरपराध नागरिकांची हत्या केली, हे ऐतिहासिक सत्य आहे. अशा अत्याचारी शासकाची तुलना महाराष्ट्राचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी व न्यायप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि इतिहासाचा घोर अपमान असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती-जमातींना एकत्र करून, सर्व धर्म-पंथांना समान न्याय देत रयतेचे राज्य असलेले स्वराज्य स्थापन केले. त्यांनी सर्व समाजघटकांना सोबत घेऊन आदर्श व लोकाभिमुख शासन व्यवस्था उभी केली. अशा महान राजाची तुलना टीपू सुलतानसारख्या अत्याचारी शासकाशी करणे अत्यंत निंदनीय असल्याची भावना यावेळी भाजपतर्फे व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा जनतेच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने, जिल्हा महामंत्री मयुर बिसेन, कल्याणी निखाडे,भंडारा शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, भंडारा नगरपरिषद अध्यक्ष मधुरा मदनकर,चंद्रकला भोपे, रुबी चड्ढा, चैतन्य उमाळकर, मंगेश वंजारी, संदीप मेश्राम, हरिचंद मडावी, प्रदीप साठवणे, शैलेश मेश्राम, अक्षय भिवगडे, निमिष डोकरीमारे,ललित जांभुळकर, शैलेश खरोले, तुषार हट्टेवार, प्रशांत श्रावणकर,शिव आजबले, दिलीप साठवणे,, सचिन तिरपुडे, नंदू राजपुरोहित, वर्षा साकोरे, नितीन गायधने, डिम्मू शेख, बल्ली पटेल ,रौनक उजवणे, ज्योती साबळे, प्रियाताई खरोले, प्रशांत निंबोळकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.