
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहरातील नगर परिषद भंडारा हद्दीत सुरू असलेल्या गटर पाईपलाईनच्या कामाबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत. सदर काम गुजरातस्थित टंल्लॅ४‘्र८ं ब्रदर्स या कंपनीकडे देण्यात आले असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. कामादरम्यान जेसीबीने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तोडल्याची घटना समोर आली आहे. तसेच गटर लाईनसाठी तयार करण्यात आलेली चेंबर्स तुटलेल्या अवस्थेत दिसून आली. अनेक ठिकाणी केवळ मातीचा भरणा करून काम उरकले जात असल्याचा आरोप आहे. संबंधित अधिकाºयांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना शहरवासीयांमध्ये व्यक्त होत आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. ‘शहरवासीयांच्या आरोग्याशी व जीवनाशी तडजोड केली जाणार नाही. निकृष्ट काम सहन केले जाणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, सिमेंटचे पक्के रस्ते तोडून गटर पाईपलाईन टाकण्यात येत असल्याने शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील इलेक्ट्रिक पोल तातडीने बाजूला करण्याचीही मागणी करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा यांच्याशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती आहे. संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.