
गोंदिया : रेल्वे सुरक्षा बल, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर मंडळाच्या ‘आॅपरेशन यात्री सुरक्षा’ अंतर्गत गोंदिया रेल्वे पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कारवाई करत रिवा-इतवारी एक्सप्रेसमध्ये झालेल्या ६.६८ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीचा छडा लावला आहे. रेल्वे पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत गुन्हा उघडकीस असून याप्रकरणी बिहार व उत्तर प्रदेशातील ४ आरोपींना मध्य प्रदेशातील कटनी मैहर परिसरातून चोरीच्या मुद्देमालासह अटक केली आहे. गोविंद कुमार महतो (३२), मोहम्मद इम्तियाज मो. अब्बास (४८) दाघेही राहणार बेगुसराय, बिहार, संतोष सत्यनारायण कौशल (४०) रा. रायबरेली, उत्तर प्रदेश, टुन्ना छोटेलाल मंडल (५०) रा. मुंगेर, बिहार अशी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमरावती येथील निलेश रायबोले हे २८ फेब्रुवारी रोजी आपल्या कुटुंबासह रेल्वेगाडी क्रमांक ११७५४ रिवा-इतवारी एक्सप्रेसच्या कोच बी/०३ (बर्थ क्र. १२ आणि १५) मधून प्रवास करत असताना १ मार्च रोजी पहाटे गोंदिया स्थानक सोडल्यानंतर त्यांची ६ लाख ६८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे असलेली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात आले. यावर त्यांनी या घटनेची तक्रार शासकीय रेल्वे पोलिस (जीआरपी) इतवारी येथे दिली. मात्र, सदर घटना गोंदिया क्षेत्रातील असल्याने घटनेच्या पुढील तपासासाठी जीआरपीगोंदियाकडे गुन्हा वर्ग करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे सुरक्षा बल नागपूरचे मंडळ सुरक्षा आयुक्त दीप चंद्र आर्य यांनी तातडीने महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील रेल्वे पोलिस अधिकाºयांशी समन्वय साधून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष टास्क फोर्स आणि क्राईम टीमची स्थापना करण्यात आली.
दरम्यान, तपास पथकाने बालाघाट आणि गोंदिया स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. यात काही संशयित व्यक्ती दिसून आले असता तक्रारदार यांच्याकडून त्यांची ओळख पटवून घेत संशयितांचा माग काढला असता ते रायपूर स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे दिसून यावर, रायपूर शहरातील हॉटेल, धर्मशाळा आणि रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका धर्मशाळेत चार संशयितांनी चेक-इन केल्याची पुष्टी झाली. त्यांचे आधार कार्ड आणि मोबाईल लोकेशनवरून ते मध्य प्रदेशातील कटनी आणि मैहर भागात असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, स्थानिक पोलिस, जीआरपी आणि आरपीएफ कटनी यांच्या संयुक्त कारवाईतून चारही आरोपींना कटनी येथून चोरीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून आरोपींकडून ६ लाख ६८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि चोरीला गेलेली ट्रॉली बॅग हस्तगत करण्यात आली आहे. सर्व आरोपींना कायदेशीर प्रक्रियेसाठी कटनीहून जीआरपी पोलिस स्टेशन, गोंदिया येथे आणण्यात आले आहे.