इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचा एल्गार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : पेट्रोल-डिझेल दरवाढ तात्काळ मागे घ्यावी व इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करावा या मागणीला घेऊन गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवार २७ मे रोजी येथील जयस्तंभ चौक परिसरातील गौरी पेट्रोल पंपावर आंदोलन केले. यावेळी शासनाच्या विरोधात नारेबाजी करत निदर्शने करण्यात आली. यानंतर काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अमर वºहाडे यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना राज्यपालांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमर वºहाडे, माजी जिल्हाध्यक्ष पुरषोत्तम कटरे, विनोद जैन, जि.प. सदस्य जितेंद्र कटरे, बलजीत सिंग बग्गा, राजेश चांदेवार, जि. प. सदस्य छबु उके, भारतीय सलामे, अनिता मुनेश्वर, भूमेश्वरी रहांगडाले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

सादर निवेदनानुसार मागील ११ दिवसात पेट्रोल व डिझेलच्या किमती ८ रुपये प्रति लिटरने वाढवण्यात आलेल्या आहेत, ही दरवाढ आधीच महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. गेल्या १२ वर्षांत पेट्रोलच्या किमती २८ टक्क्यांनी तर डिझेलच्या किमती ६२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या कार्यकाळात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत गेलेले असतानाही, पेट्रोल आणि डिझेलची किमत ७२ रुपये लिटरच्या वर जाऊ दिली नव्हती. मात्र, मागील काही वर्षांत कच्च्या तेलाचा भाव ५०-५५ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास असतानाही पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या आसपास होते. अलीकडील दरवाढीमुळे तेल कंपन्यांनी हजारो कोटी रुपयांचा नफा कमावला असून ही नफेखोरी जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारी आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर देखील वाढत असून महागाई अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाल्याने शेतीची कामे अडचणीत आली आहेत. त्यामुळे या बाबींचा संवेदनशील विचार करून पेट्रोलडिझेल दरवाढ तात्काळ मागे घ्यावी व इंधनाचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *