
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : अंगाची लाहीलाही करणाºया भीषण उन्हात स्थानिक सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याचा तीव्र ठणठणाट निर्माण झाला होता. लाखो रुपये खर्च करून लावलेल्या ५ आरओ मशीनपैकी ३ मशीन प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे धूळखात पडल्या होत्या. अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाºया प्रसूती गृहातील गरोदर मातांच्या वॉर्ड क्रमांक ३ मध्येही पाण्याची सोय नसल्याने गरीब रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते, तर काहींना बाहेरून पाणी विकत घ्यावे लागत होते.
या गंभीर समस्येची दखल घेत स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी थेट जिल्हा शल्य चिकित्सकांकडे सोमवारी लेखी पत्राद्वारे तीव्र शब्दांत दाद मागितली. रुग्णालयातील सर्व बंद आरओ यंत्रे युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात यावीत आणि प्रसूती वॉर्डसह सर्वच वॉर्डांमध्ये रुग्णांसाठी २४ तास शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी लावून धरली. आंदोलनाचा इशारा मिळताच प्रशासनाची धावपळ… या समस्येला वाचा फोडल्यानंतर आणि स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम यांनी दिलेल्या इशाºयानंतर रुग्णालय प्रशासनाला जाग आली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन मिसुरकर यांनी तांत्रिक अडचणींचे कारण पुढे केले असले, तरी अमित मेश्राम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर बुधवारपासून रुग्णालयातील बंद आरओ मशिन्सच्या दुरुस्तीच्या कामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे.