गायीला वाचवताना तलावात बुडून तरुणाचा मृत्यू वाढदिवशीच काळाचा घाला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : अर्जुनी मोर तालुक्यातील कोहलगाव येथील २३ वर्षीय तरुण विलास शंकर सोनवाने याचा गाय वाचवण्याच्या प्रयत्नात तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे ही घटना त्याच्या वाढदिवशीच घडल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विलास सोनवाने हा शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरच्या गाय-म्हशी चरायला घेऊन गेला होता. गावालगत असलेल्या मामा तलावावर जनावरांना पाणी पाजत असताना कळपातील गाईंपैकी एक गाय पाण्यात अधिक आत गेली. तिला बाहेर काढण्यासाठी विलास तलावात उतरला. मात्र तलावातील पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि दुर्दैवाने बुडाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नवेगाव बांध पोलिस ठाण्याचे ठाणेदार अजित पाटील घटनास्थळी दाखल झाले असून पोलिस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने तलावात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. याच दिवशी विलास सोनवाने याचा वाढदिवस असल्याने या दुर्दैवी घटनेने कोहलगाव परिसरात शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *