
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : शेतकरी कोणत्याही बँकेचा कर्जदार असो, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणारच. राष्ट्रीयीकृत बँक असो की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पीक कर्ज देणाऱ्या प्रत्येक संस्थेचे थकीत कर्ज सरकार माफ करणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कर्जमाफीवरून सुरू असलेल्या सर्व चर्चांना पूर्णविराम देत मुख्यमंत्र्यांनी शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना शेतकºयांचा संभ्रम दूर केला. अमरावती रोडवरील लिंगा येथे ४४ एकरातील ७०० कोटी रुपये गुंतवणुकीच्या एक्सियो अॅडव्हान्स इंडस्ट्रियल आणि मॅन्युफॅक्चरिंग पार्कचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. त्यानंतर ते म्हणाले की, विदर्भाच्या औद्योगिक क्रांतीला वेग आला असून, नागपूर लवकरच देशाचे ‘लॉजिस्टिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग हब’ म्हणून ओळखले जाईल.