
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : अर्जुनी मोर तालुक्यातील बोंडगावदेवी येथील २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह ईटियाडोह धरणाच्या कालव्यात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आशिष जितेंद्र मेश्राम (२३), रा. बोंडगावदेवी असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्या मृत्यूबाबत वडिलांनी घातपाताचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे लेखी निवेदन दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष मेश्राम हा धुलीवंदनाच्या दिवशी मित्रांसोबत गावात फिरत होता. मंगळवार (३ मार्च) सायंकाळपर्यंत तो गावात दिसून आला.
मात्र रात्रीपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. दुसºया दिवशी नातेवाईकांकडेही चौकशी करण्यात आली, मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. दरम्यान, ५ मार्च रोजी आशिष बेपत्ता असल्याची तक्रार त्याचे वडील जितेंद्र मेश्राम यांनी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात नोंदवली. त्याच दिवशी गोठणगाव-प्रतापगड मार्गावरील ईटियाडोह धरणाच्या कालव्यातून एक मृतदेह वाहत येत असल्याची माहिती केशोरी पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर ठाणेदार मंगेश काळे हे पथकासह चिचोली येथील तिबेटियन कँप परिसरात दाखल झाले आणि कालव्यातील मृतदेह बाहेर काढून ताब्यात घेतला.
मृतदेहाच्या हातावर ‘आशिष’ असे नाव लिहिलेले असल्याने तसेच अर्जुनी-मोरगाव येथे त्याच दिवशी बेपत्ता तक्रार नोंद झाल्याने तो आशिष मेश्राम असल्याची खात्री पटली. कुटुंबीयांनीही ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह अर्जुनीमोरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनावेळी मृतकाच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त करत संबंधित संशयितांना अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका घेतली. त्यामुळे काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी अर्जुनीचे ठाणेदार कमलेश सोनटक्के व केशोरीचे ठाणेदार मंगेश काळे हे पोलिस बंदोबस्तासह उपस्थित होते. पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी बोंडगावदेवी येथे नेला. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास केशोरी व अर्जुनी-मोरगाव पोलीस करीत आहेत.