
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तालुक्यातील संगम पुनर्वसन येथील गावकºयांना शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी लाखों रुपये खर्च करून पाण्याची नविन टाकी बांधण्यात आली. मात्र मागील एक महिन्यापासून बोअरवेल नादुरुस्त आहे. त्यामुळे गावातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना ठप्प असून पाण्यासाठी गावकºयांची वणवण सुरू आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा चढला असून उन्हाची दाहकता वाढली, त्यामुळे गावातील घरगुती पाण्याचे स्रोत पूर्णत: आटले असून विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे पिण्यासाठी तसेच घरगुती वापराचे पाणी कुठून आणावे? असा नागरिकांना प्रश्न पडला आहे.
‘हर घर नल, हर घर जल’ या योजने अंतर्गत घरगुती नळाला पाणी मिळण्याची नागरिकांना अपेक्षा होती, मात्र स्थानिक प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे मागील एक महिन्यापासून पाणी पुरवठा करणारी बोअरवेल नादुरुस्त आहे. त्यामुळे गावात ‘हर घर नल, हर घर जल’ या योजनेचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र आहे. देशातील बहूतांश लोकसंख्या ग्रामीण भागामधे राहते. ग्रामीण भागातील जनतेस शुध्द व स्वच्छ आरोग्यदायी पाणी पुरवठा करणे सरकारचा मुख्य उद्देश आहे, शासनाच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीस ४० लीटर पाणी दरदिवशी दरमाणसी आवश्यक आहे. मात्र संगम पुनर्वसन येथील पाण्याच्या टाकीतून एक थेंबही पाणी घरगुती नळाला येत नाही. ग्रामीण जनतेला पिण्याचे पाणी व आरोग्याच्या बाबीकडे प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची गरज असून नळाला शुद्ध पाणी द्यायचे नव्हते तर लाखों रुपयाचा चुराडा का केला? अशी गावकाºयांची प्रतिक्रिया आहे.