
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यात पुन्हा एकदा रेती माफियांची दबंगगीरी पुढे आली असून तीन रेती तस्करांनी सडक अजुर्नी येथील वनपरिक्षेत्राधिकारी यांच्यावर हल्ला करून त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून वन विभागाकडूनही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्राधिकारी मिथुन तरोणे हे ४ मार्च रोजी पथकासह सायंकाळच्या सुमारास कोसमतोंडी वनपरिक्षेत्रात गोंगले बीटच्या कंपार्टमेंट क्रमांक १३३५ च्या झुडुपे वनक्षेत्रात गस्त घालत असताना त्यांना रंगेपार नाल्याजवळ ट्रॅक्टर चालक पवन कापगते (२५), विजय भिकारू टेंभूरकर (५०) व पंकज विजय टेंभूरकर (२६) हे तिघेही विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये बेकायदेशीरपणे वाळू वाहून नेताना दिसून आले. यावेळी त्यांनी वन अधिकाºयांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
प्रसंगी पथकातील अधिकाºयांनी ट्रॅक्टरचा पाठलाग करून जवळच्या मालेजुंगा येथे आरोपी विजय टेंभुरकर याच्या घराजवळ ट्रॅक्टर पकडला. दरम्यान, आरोपी ट्रॅक्टर चालकास ट्रॅक्टर वन विभागाच्या कार्यालयात आणण्याचे निर्देश दिले असता आरोपींनी नकार संग्रहित छाया विजय टेंभुरकर आणि त्याची पत्नी दोघांनी गोंधळ घालून वन अधिकाºयांना शिवीगाळ केली. तर शासकीय वाहनासमोर येऊन वन परिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे यांच्याशी वाद घालून त्यांच्यावर हल्ला करत धक्काबुक्की केली. यावेळी कर्तव्यावर असलेले वन परिक्षेत्र सहाय्यक फूलचंद शेंडे, वनरक्षक आनंद गवळे, वन कर्मचारी चुडामन पुस्तोडे आणि शामकुवर गौरी हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान, या घटनेची तक्रार डुग्गीपार पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून न्यायालयाच्या आदेशा नुसार त्यांना अटक करण्याची कारवाई सुरू असल्याचे डुग्गीपारचे पोलिस निरीक्षक गणेश वनारे यांनी सांगितले.