
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नागेश भास्कर यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डीआयजी अंकित गोयल यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. पोलिस निरीक्षक नागेश भास्कर यांनी वाहतूक शाखेत रुजू झाल्यापासून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुढाकार घेत विविध उपाययोजना राबवल्या. वाहतुकीचे नियम मोडणाºयांविरोधात विशेष मोहीम राबवत कठोर कारवाई करण्यात आली. तसेच वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई सोबतच वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले. याशिवाय वाहतुकीचे नियम पाळणाºया नागरिकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करत सकारात्मक जनजागृती करण्याचा उपक्रमही त्यांनी राबविला. वाहतूक शिस्तीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाहतूक शाखेत केलेले आमूलाग्र बदल, प्रभावी अंमलबजावणी आणि उल्लेखनीय कार्याची दखल घेत डीआयजी अंकित गोयल यांच्या हस्ते त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्यासह जिल्हा पोलिस प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.