
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शिक्षक आणि विद्यार्थिनींच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना भंडारा जिल्ह्यात उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. ज्या विद्यार्थिनींचे दुधाचे दात अजून पडलेले नाही अशा निरागस चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत शाळेतील हैवान शिक्षक असे काही करायचा जे ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल. विकृत शिक्षकाचा पराक्रम उघड झाल्यानंतर संतप्त पालकांनी भर चौकात चप्पल जोड्यांनी त्याची चांगली धुलाई करीत पोलिसांच्या स्वाधीन केले.
पवनी तालुक्यातील वडेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने शाळकरी विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. अनिल जगन राऊत (वय ५४) असे शिक्षकाचे नाव आहे. ही माहिती मिळाल्यानंतर संतप्त पालकांनी शिक्षकाला जाब विचारून भर चौकात चांगलाच चोप दिला. या प्रकरणी पवनी पोलिस ठाण्यात शिक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वडेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते चौथी पर्यंत वर्ग आहेत. या शाळेची पटसंख्या १९ असून ही एक शिक्षकी शाळा आहे.
पाच वर्षांपूर्वी अनिल राऊत हा शिक्षक बदली होऊन या शाळेत आला. मात्र विकृत मानसिकतेच्या या शिक्षकानेशाळेत विद्यार्थिनींना शिकवण्या ऐवजी भलतेच धडे देण्यास सुरुवात केली. चिमुकल्या विद्यार्थिनींना नको ते व्हिडिओ दाखवून हा नराधम शिक्षक शाळेतील मुलींशी अश्लील वर्तन करून त्यांच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता. चिमुकल्या विद्यार्थिनी सोबत जवळीक साधून त्यांच्याशी गैरकृत करण्याचा प्रयत्न करायचा. हा प्रकारमुलींच्या पालकांना समजला. त्यानंतर ग्रामस्थ मंगळवारी एकत्र येऊन शाळेत आले. त्यांनी संबंधित शिक्षकाला याबाबत विचारणा केली. त्या वेळी संतप्त झालेल्या काही महिलांनी संबंधित शिक्षकाला चप्पलने चोप दिला. आक्रमक झालेल्या पालकांनी या शिक्षकाचे कपडे काढून भर चौकात त्याला चांगलेच चोपले. या शिक्षकाने शाळेतील जवळपास सर्वच मुलींशी गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. सध्या पवनी पोलीस ठाण्यात या नराधम शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.