शोभायात्रा शिस्त, पर्यावरणाचा आदर्श घालून देणारी ठरेल!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : प्रभू श्रीरामाची शोभायात्रा भक्ती आणि उत्साहाचा संगम असतो. मात्र सोबतच शिस्त,पर्यावरण आणि स्वच्छता याचा आदर्श घालून देणारी ही शोभायात्रा ठरावी, या दृष्टीने यावर्षी श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. गुढीपाडवा ते श्रीराम नवमी दरम्यान होणारे विविध धार्मिक आयोजन नगराच्या या उत्सवाला अधिक प्रगल्भ करणारे ठरतील, असा विश्वास श्रीराम शोभायात्रा समितीचे अध्यक्ष तुषार काळबांधे यांनी व्यक्त केला. श्रीराम शोभायात्रा समिती, भंडाराच्या वतीने गुढीपाडवा ते श्रीराम नवमी या कालावधीत आयोजित विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर माहिती देण्याच्या दृष्टीने आज श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.

यावेळी समितीचे अध्यक्ष तुषार काळबांधे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीला माहिती दिली. शोभायात्रेचे हे ५४ वे वर्ष आहे. नगराचा हा उत्सव वर्षानुवर्षापासून अखंडपणे सुरू आहे. प्रत्येक वर्षी वेगळेपण जपण्याचा प्रयत्न समितीच्या पदाधिकाºयांकडून केला जातो. समिती निमित्त असली तरी नगरवासीयांच्या सहकार्यातुनच हा उत्सव पूर्णत्वास जातो, असे काळबांधे यांनी सांगितले. १९ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ७ वाजता धर्मध्वजाचे रोहन आणि गुढी उभारून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ढोलताशा पथकाचे वादन केले जाईल. २० रोजी शालेय विद्यार्थ्यांच्या श्रीराम रक्षा स्तोत्र पठणाचा कार्यक्रम गांधी चौकात सकाळी ७ वाजता होणार आहे. २१ रोजी स्थानिक कलाकारांची भजन संध्या, २२ ला असर फाउंडेशनची प्रभू श्रीरामांच्या जीवनावरील आधारित नाटिका, २३ रोजी खाटू श्याम भजन संध्या, २४ रोजी सुंदरकांड, २५ रोजी नागपूरच्या सुरसंगम समूहाच्या वतीने सुरभी ढोमणे व गायक कलाकारांच्या भजन संध्येचे आयोजन करण्यात आले आहे.

हे सर्व कार्यक्रम बहिरंगेश्वर मंदिर परिसरात संध्याकाळी ७ वाजता होणार असल्याचे सांगण्यात आले. २६ रोजी प्रभू श्रीरामाची भव्य शोभायात्रा खांबतलाव मंदिर परिसरातून संध्याकाळी ५ वाजता निघेल. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते रथाचे पूजन करून रथ मार्गस्थ होईल. दरवर्षी प्रमाणेयावेळीही चित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून उत्तम सादरीकरण करणाºया १० चित्ररथांना प्रोत्साहन पर तीन हजार रुपये दिले जाणार आहे. शिवाय प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरस्कार दिला जाणार आहे. महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. श्रीराम शोभायात्रा भक्ती आणि श्रद्धेचा संगम आहे. त्यातूनच स्वत:च्या कर्तव्याची जाणीव व्हावी, शिस्त आणि पर्यावरणाचे महत्व पटावे या दृष्टीने यावेळी शोभायात्रेत स्वच्छतेवर विशेष भर दिला जाणार असल्याचे सांगून नागरिकांनीही याला सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष काळबांधे यांनी केले. ९ दिवस चालणाºया या नगर उत्सवात प्रत्येकाने सहभागी व्हावे, श्रीराम नवमीच्या दिवशी घरावर भगवा फडकावून आनंदोत्सव साजरा करावा, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला समितीचे सचिव मंगेश वंजारी, उपाध्यक्ष सुरेश धुर्वे, अजित आस्वले, प्रकाश पांडे, धनंजय ढगे, दीपा नायर, साधना त्रिवेदी, चिन्मय आंबेकर उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *