
भंडारा : भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, मात्र आता लोकसभा सचिवालयाने त्यांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा कामकाजात सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे आता ते पुन्हा एकदा संसदेत आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडू शकतील. लोकसभा सचिवालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्राद्वारे हा निर्णय जाहीर करण्यात आला. यापूर्वी दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांना सभागृहाच्या सेवेतून निलंबित करण्यातआले होते. सदर आदेश अजय कुमार सूद, संचालक, लोकसभा सचिवालय यांच्या स्वाक्षरीने जारी झाला असून, दि. १७ मार्च २०२६ पासून डॉ.पडोळे यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. निलंबनाच्या काळात डॉ. पडोळे यांनी शांत बसण्याऐवजी आक्रमक भूमिका घेत लोकसभेच्या पायºयांवर आंदोलन केले. विविध जनहिताच्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवत सरकारला धारेवर धरले. विशेष म्हणजे, सभागृहाबाहेरूनही त्यांनी आपली लढाई सुरू ठेवत शेतकरी, बेरोजगारी, ओबीसी जनगणना, तसेच स्थानिक प्रश्न यांसारखे मुद्दे राष्ट्रीय पातळीवर मांडले.