
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : गॅस सिलेंडरचा तुटवडा लक्षात घेता साठेबाजी व काळाबाजार रोखण्यासाठी गठित केलेल्या पथकाने भंडारा शहरातील पिरॅमिड गॅस एजन्सीवर धाड टाकुन तब्बल ५७ गॅस सिलेंडर जप्त केले. सद्यस्थितीत जागतिक युद्धाची परिस्थिती विचारात घेता इंधनाबाबत तुटवडा निर्माण होण्याची शयता नाकारता येत नाही. इंधनाचे दर वाढण्याची, घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर होण्याची शयता आहे. अशा स्थितीत घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण सुरळीत होण्यासाठी तसेच अवैध गॅस सिलेंडर विक्री व वापरणाºयांवर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे भंडारा शहर आणि जिल्ह्यामध्ये सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांनी चोरट्या मार्गाने घरगुती गॅसचा वापर सुरू केल्याच्या तक्रारी पुरवठा विभागाकडे आल्या आहेत.
घरगुती ग्राहकांकडूनदेखील गॅस सिलिंडर वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी असून, नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून अन्न आणि पुरवठा विभागाच्या पथकाकडुन अवैध सिलेंडर साठेबाजीवर सातत्याने कारवाई सुरू आहेत. दरम्यान १६ मार्च २०२६ रोजी भंडारा एम.आय.डी.सी. परिसरात जिल्हा पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली आहे. अधिकृत परवाना आणि फलक नसलेल्या या गोदामात घरगुती वापराच्या (१४.२ किलो) सिलेंडर्सचा मोठा साठा सापडला. जप्त केलेल्या ५७ सिलिंडर पैकी १४.२ किलो (घरगुती): ४० रिकामे सिलिंडर,१९ किलो (व्यावसायिक): ८ रिकामे सिलिंडर ५ किलो (लहान): ५ रिकामे सिलिंडर,१० किलो (घरगुती): २ भरलेले आणि १ रिकामा सिलिंडर (एकूण ३), ५ किलो (घरगुती): १ असे भरलेला सिलिंडर ५४ रिकामे आणि ३ भरलेले सिलिंडर असे एकूण ५७ सिलिंडर जप्त करण्यात आले.
तपासणी दरम्यान, सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असणारी आग प्रतिबंधक यंत्रे किंवा गॅस सिलेंडर मोजण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजनकाटा यांसारखी कोणतीही साधने तिथे उपलब्ध नसल्याचे दिसून आले, जे नियमांचे गंभीर उल्लंघन आहे. गोदामावर उपस्थित असलेले मनीष भूपेंद्र खारा (वय ५२, रा. भंडारा) यांना कागदपत्रांची मागणी केली असता, त्यांनी कोणतेही अधिकृत परवाने सादर केले नाहीत. तसेच, गोदामातील साठ्याबाबत त्यांनी प्रशासनाला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्या वाहनचालकाने (प्रभाकर मेश्राम) त्यांच्या वाहनाची बॅटरी डाऊन झाल्याने रिकामे सिलेंडर तिथे ठेवल्याचे सांगितले. तरी मोठ्या प्रमाणातील साठा पाहता या गोदामातुन अनाधिकृतरित्या गॅस सिलेंडरचा पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सदर कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रतनलाल ठाकरे, खरेदी अधिकारी सुहास टोंग, निरीक्षण अधिकारी लाखनी रोशन कापसे, निरीक्षण अधिकारी, भंडारा पोचीराम कापडे, निरीक्षण अधिकारी, साकोली रविंद्र उन्हाळे, निरीक्षण अधिकारी लाखांदुर धीरज मेश्राम व पथकाने केली. जप्त केलेला मुद्देमाल त्याच गोदामात ठेवून गोदामाला ‘सील’ करण्यात आले आहे. पुरवठा विभागाच्या परवानगीशिवाय हे सील उघडू नये, अशा कडक सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत, पिरॅमिड गॅस एजन्सी विरूध्द कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव संबधित आॅईल कंपनीच्या अधिका-यांना सादर करण्यात येणा असल्याचे सांगण्यात आले आहे.