
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- ग्रामीण भागातील महिला स्वयं सहायता समूहातील महिलांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या दर्जेदार उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात ‘विभागीय सरस व विक्री महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रदर्शन गोंदिया येथील प्रीतम लॉन येथे २९ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत संपन्न होणार असून नागरिकांसाठी एकाच छताखाली स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेले उत्पादनांची खरेदी त्याचबरोबर विदर्भातील खाऊ गल्लीच्या अस्सल चवीच्या आस्वादासह सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी राहणार आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी शासनस्तरावर ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) च्या वतीने हे उपक्रम राबविण्यात येत असून मागील १७ ते २१ फेब्रुवारी दरम्यान जिल्ह्यात ‘पलाश’ मिनी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागातील १२५ स्वयंसहायता समूहसहभागी झाले होते. दरम्यान, आता २९ ते ३१ मार्च या कालावधीत विभागीय सरस प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून सकाळी १० ते रात्री १० या वेळेत ही प्रदर्शनी राहणार आहे. विशेष म्हणजे, या सर्वप्रदर्शनीत नागपूर विभागातील जिल्ह्यातील स्वयं सहायता समूहांचा सहभाग राहणार आहे.
यात विशेषत: नागपूर विभागातील जिल्ह्यांतील ग्रामीण समूहातील महिलांनी बनवलेल्या आकर्षक वस्तू, हस्तकला, आणि गृहोपयोगी वस्तूंची प्रदर्शनी व विक्री करण्यात येणार असून ग्रामीण महिलांनी तयार केलेले मसाले, लोणची, पापड आणि सेंद्रिय धान्य एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यातच खाऊ गल्लीच्या माध्यमातून विदर्भातील अस्सल चवीच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी व दररोज सायंकाळी स्थानिक कलावंतांचे तसेच महिलांचे मनोरंजनात्मक कार्यक्रमाची मेजवानी या प्रदर्शनीत राहणार आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन २९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येईल. यावेळी खा. प्रफुल पटेल, खा. डॉ. प्रशांत पडोळे, खा. डॉ. नामदेव किरसान, आ. परिणय फुके, आ. अभिजित वंजारी, आ. सुधाकर आडबाले, आ. राजकुमार बडोले, आ. विजय रहांगडाले, आ. विनोद अग्रवाल, आ. संजय पुराम, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी (भा.प्र.से), जिल्हा परिषद गोंदियाचे सर्व सभापती तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस चालणा?्या या उपक्रमात नागपूर विभागातील ग्रामीण महिला समुहांनी तयार केलेल्या विविध वस्तू प्रदर्शन व विक्री करिता राहणार आहेत. तेव्हा, जिल्ह्यातील तसेच नागपूर विभागातील नागरिकांनी या प्रदर्शनीला भेट देऊन ग्रामीण महिलांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले आहे.