
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : झाडीबोली चळवळीचे प्रणेते व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना प्रतिष्ठित साहित्यव्रती पुरस्कार जाहीर झाला आहे. मातोश्री स्व. सूर्यकांतादेवी रामचंद्रजी पोटे चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती तर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाडय निर्मिती पुरस्कार योजनेंतर्गत ही निवड करण्यात आली आहे. ३० मार्च २०२६ रोजी अमरावती येथे मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रकमेने त्यांचा सन्मान होणार आहे. डॉ. बोरकर यांनी कथा, कविता, नाटक, संगीतिका तसेच भाषाशास्त्र, लोकसाहित्य व शब्दकोश अशा विविध क्षेत्रांत १११ ग्रंथांची निर्मिती केली आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाडय पुरस्कार चार वेळा, तसेच भाषा संवर्धक पुरस्कार प्राप्त झाला आहे. याशिवाय विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार व संगीत नाटक अकादमीचा ‘अमृत’ सन्मानही त्यांनी पटकावला आहे. या पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. बोरकर यांनी तो आपल्या दिवंगत पत्नी ताराबाई यांच्या स्मृतीला अर्पण केला. या सन्मानामुळे झाडीबोली साहित्य चळवळीला नवे बळ मिळणार असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढणार आहे.