
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : शहरातील गणेश वार्ड येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा क्र. १ (सेमी इंग्लिश) मध्ये मागील तीन दिवसांपासून विद्युत साहित्यांची चोरी होत असल्याने शाळा प्रशासनात खळबळ उडाली आहे. ‘विद्येचे मंदिर’ समजल्या जाणाºया या शाळेत वारंवार होणाºया चोरीच्या घटनांमुळे संताप व्यक्त होत आहे. मुख्याध्यापक एस. आर. हटवार यांनी मंगळवारी (२४ मार्च) साकोली पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. शुक्रवारी (२१ मार्च) रात्री शालेय अन्नग्रहण परिसरातील बोअरवेलला जोडलेला सर्व्हिस वायर अज्ञात चोरट्यांनी चोरी केला. शाळेने नव्याने वायर (किंमत २६७० रुपये) बसवला; मात्र तोही मंगळवारी पुन्हा चोरीला गेला. यापूर्वी वर्ग ६ चा कुलूप तोडून दोन एलईडी दिवे (किंमत १२०० रुपये) व इतर साहित्य चोरून नेण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस निरीक्षकएम. पी. आचरेकर व त्यांच्या सहकाºयांसोबत शाळा व्यवस्थापन समितीने चर्चा केली. पोलिसांनी चोरांचा शोध घेण्याचे आश्वासन दिला असून, शासकीय मालमत्तेची चोरी केल्यास कठोर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.