
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली शहरात पेट्रोल- डिझेलची प्रत्यक्ष टंचाई नसतानाही अफवांमुळे गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो व संदेशांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, त्यामुळे वाहनधारक गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी करत आहेत. परिणामी अचानक वाढलेल्या मागणीमुळे पेट्रोल पंपांवरील उपलब्ध साठा वेगाने संपत असून, टँकरद्वारे नवीन इंधन पोहोचण्यास लागणाºया वेळेमुळे तात्पुरता ताण निर्माण होत आहे.
सामान्यत: ५० किंवा १०० रुपयांचे पेट्रोल भरणारे वाहनचालकही अफवांच्या प्रभावाखाली येऊन ५०० ते १०००रुपयांपर्यंत इंधन भरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागत असून काही ठिकाणी वाहतूक कोंडीचीही समस्या निर्माण झाली आहे. पंप संचालकांना दिवसभर व उशिरापर्यंत इंधन वितरण करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ गरजेनुसारच इंधन खरेदी करावी.
“तहसीलदार निलेश कदम यांनी स्पष्ट केले की, तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणतीही घाबराट बाळगू नये. वाहनधारकांनी अनावश्यक गर्दी टाळून केवळ गरजेनुसारच इंधन खरेदी करावी, जेणेकरून पुरवठा सुरळीत राहील. साठवणुकीसाठी जादा इंधन खरेदी करणाºयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच पेट्रोल पंप चालकांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.”
निलेश कदम तहसीलदार,साकोली
“सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये पेट्रोलडिझेल टंचाईची चुकीची धारणा निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, गरजेपेक्षा अधिक खरेदी आणि गदीर्मुळेच तात्पुरता ताण निर्माण होत आहे. मोदींनी सांगितले की एकाच दिवशी पाच तासांमध्ये सात हजार लिटर पेट्रोल विक्री करण्याचा रेकॉर्ड बनला. नागरिकांनी अफवांना बळी न पडता केवळ आवश्यकतेनुसार इंधन खरेदी करावे.”
दिनेश मोदी पेट्रोल पंप संचालक