वीज पडून १७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : निसर्गाचा लहरीपणा एका उमद्या तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना आज दिनांक ५ एप्रिल रोजी सकाळी रामगड येथे घडली. विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात अंगावर वीज पडल्याने मुरमाडी येथील १७ वर्षीय दिशांत रवी सती मेश्राम या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे लाखांदूर तालुक्यासह मुरमाडी परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुरमाडी येथील रहिवासी असलेला दिशांत मेश्राम हा रामगड येथील ‘गणेश डेकोरेशन’ कडे कामासाठी गेला होता.

रविवारी सकाळी तोनेहमीप्रमाणे आपल्या कामात व्यस्त असताना अचानक वातावरणात बदल झाला. ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. यादरम्यान, दिशांत कामावर असतानाच त्याच्या अंगावर अचानक वीज कोसळली. हा तडाखा इतका भीषण होता की, दिशांतचा जागीच मृत्यू झाला.दिशांत हा केवळ १७ वर्षांचा होता. घरची परिस्थिती बेताची असल्याने तो कामासाठी रामगडला गेला होता. मात्र, कामाच्या ठिकाणीच काळाने त्याच्यावर झडप घातली. ऐन उमेदीच्या वयात दिशांतचा असा दुदैर्वी अंत झाल्याने मेश्राम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्याच्या निधनाची बातमी मुरमाडी गावात समजताच संपूर्ण गावासह परिसरात शोककळा पसरली असुन हळहळ व्यक्त केली जात आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *