
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : स्थानिक आमदार राजू कारेमोरे व नगराध्यक्ष इंजि. सागर गभने मित्र परिवाराच्या वतीने सामाजिक बांधीलकी जपत ‘चालता-फिरता दवाखाना’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी तुमसर येथील दत्त मंदिर (मोठा बाजार), सिहोरा रोड येथे भव्य आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले.
या शिबिरात परिसरातील शेकडो नागरिकांनी आपल्या आरोग्याची मोफत तपासणी करून घेतली. या आरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने विविध आजारांच्या रुग्णांची सखोल तपासणी केली. यामध्ये प्रामुख्याने नेत्ररोग, मेडिसिन, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, काननाक-घसा, अस्थिरोग, त्वचारोग आणि श्वसनविकार यांसारख्या व्याधींवर उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांना जवळचे चष्मे, आवश्यक औषधे आणि आयड्रॉपचे मोफत वाटप करण्यात आले. हसारा येथील ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झालेल्या या शिबिरात २६० हून अधिक नागरिकांनी उपचार घेतले. तपासणी दरम्यान ६७ रुग्णांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले.तसेच, ज्या रुग्णांना गंभीर स्वरूपाचे आजार आहेत किंवा शस्त्रक्रियेची गरज आहे, अशा ५२ रुग्णांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.
या सर्व रुग्णांचे नागपूर येथील संपूर्ण उपचार मोफत केले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मीनल निमजे, आरती मोहतुरे, पल्लवी निनावे, बाल्या बिसने, अखिल चकोले, प्रदीप भरनेकर, सागर भुरे, ललित शुक्ला, राजू गायधणे, शुभम बानासुरे, राहुल रणदिवे, बापू बडवाईक, बालेश्वर लांजेवार, अर्पित खानोरकर, आयुष कुंजेकर, संकेत गजबीये, मनीष गायधणे, प्रवीण फटिंग, तूषार बिसणे, भूषण सानेकर, जितू निखाडे, रोहित चिधालोरे, चिंकु नेवरगडे यांच्यासह मित्र परिवारातील सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.