मुलाच्या धाडसाने आईचा जीव वाचला साकोलीत वाघाचा पुन्हा एका महिलेवर हल्ला

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी साकोली : ‘आईवर झडप घालणाºया वाघासमोर स्वत:चा जीव धोक्यात घालून उभा ठाकलेला मुलगा आणि त्याच्या धाडसामुळे वाचलेले आईचे प्राण’, साकोली तालुक्यातील आमगाव खुर्द येथे घडलेली ही घटना अंगावर शहारे आणणारी ठरली आहे. तन्मय मुंगमोडे या १८ वर्षीय युवकाने प्रसंगावधान राखत केलेल्या आरडाओरडी व प्रतिकारामुळे वाघाने माघार घेतली आणि त्याची आई छाया मुंगमोडे यांचा जीव थोडक्यात बचावला. मात्र, या घटनेमुळे परिसरात नरभक्षक वाघाच्या दहशतीचे सावट आणखी गडद झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, आमगाव खुर्द येथील रहिवासी छाया सुधाकर मुंगमोडे (वय ४३) या आपला मुलगा तन्मय (वय १८) याच्यासोबत १ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास गावालगतच्या जंगल परिसरातील शेतात तुरीच्या तुराट्या संकलित करण्याचे काम करत होत्या.

यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक छायावर हल्ला चढविला. आईच्या किंकाळ्या ऐकताच तन्मयने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्याने मोठ्याने आरडाओरड करत वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मुलाच्या या धाडसी प्रतिकारामुळे वाघाने घटनास्थळावरून पळ काढला आणि मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात छाया मुंगमोडे यांच्या गळ्याजवळ व डोक्याखाली गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेला तातडीने साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, साकोली तालुक्यात गेल्या १२ दिवसांत वाघाच्या हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. १९ मार्च रोजी बाम्पेवाडा येथे वसंता मेश्राम यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, तर २८ मार्च रोजी उमरझरी येथे माया सोनवणे या महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. आता पुन्हा आमगाव खुर्द येथे झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी मोहीम तीव्र केली आहे. परिसरात पिंजरे लावण्यात आले असून सर्च आॅपरेशन सुरू आहे. तसेच रेस्क्यू टीम तैनात करण्यात आली असून ड्रोन व तात्पुरत्या टॉवरच्या माध्यमातून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. वाघ दिसताच त्याला ट्रॅन्क्विलायझरच्या सहाय्याने पकडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तरीदेखील वाघ अद्याप हाती लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, २८ मार्च रोजी संतप्त ग्रामस्थांनी साकोली-तिरोड़ा मार्ग रोखून आंदोलन केले होते. आठ दिवसांत वाघाला पकडण्यात यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता. जंगलालगतच्या शेतांमध्ये काम करणाºया शेतकºयांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *