
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : श्याम महाजन बहुउद्देशीय विकास संस्था (शेडेपार), धुकेश्वरी मंदिर ट्रस्ट आणि देवरी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२६ अंतर्गत विविध क्षेत्रांतील गुणवंतांची घोषणा करण्यात आली आहे. हा दिमाखदार सोहळा रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता धुकेश्वरी मंदिर सभागृह, देवरी (जि. गोंदिया) येथे होणार आहे. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानासाठी किशोर शिवशंकर गडकरी (साकोली) यांना दर्पण गौरव पुरस्कार तर शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी रामकृष्ण मदन चाचेरे (साकोली) यांना शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
कृषिभूषण पुरस्कार अनिल शिवलाल किरणापुरे, आदर्श शिक्षिका पुरस्कार ऋतुजा रविंद्र गवस, समाजभूषण संतोषकुमार तीवारी, नारीरत्न मेघा मनोज अग्रवाल, ग्रामभूषण बापू शांताराम परब, सहकार महर्षि डी.के. आरीकर, पर्यावरण भूषण बादल निळकंठ बेले आणि प्रशासक रत्न डॉ. चंद्रसुरेश डोंगरवार यांना देण्यात येणारआहेत. तसेच भारतीय संस्कृती रक्षक पुरस्कार मांडोदेवी ग्रामीण जनकल्याण संस्था व सेवाभाव भूषण नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांना जाहीर झाला आहे. सोहळ्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांच्या अध्यक्षतेखाली खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या हस्ते होणार असून आमदार संजय पुराम, इंजि. राजकुमार बडोले, विनोद अग्रवाल, पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आयोजकांनी सर्व पुरस्कारप्राप्तांचे अभिनंदन करून नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.