
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील अडयाळ येथील ग्रामीण रुग्णालयाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून होत असल्याने भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी अड्याळ येथे नवीन रुग्णालयाच्या बांधकामाची त्या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान बांधकामामध्ये वापरण्यात येणाºया साहित्याचा दर्जा अत्यंत खालावलेला असल्याचे निदर्शनास आले. तसेच कामामध्ये अनेक तांत्रिक त्रुटी असून भविष्यात रुग्णालयाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच कामाची गुणवत्ता सुधारून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिले. सबंधित ठेकेदाराचे देयके देण्यात येऊ नये. इमारमीमध्ये मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या असुन भर उन्हात स्लॅप गळती असल्याची बाब समोर आल्याने सदर कामाची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी खा.पडोळे यांनी केली आहे. रूग्णांची केली विचारपुस खा.प्रशांत पडोळे यांनी ग्रामीण रूग्णालयाची पाहणी केल्यानंतर रूग्णालयातील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांची आस्थेने विचारपुस केली. स्थानिक नागरिकांनीही आपल्या समस्या मांडत लवकरात लवकर योग्य कारवाई करण्याची मागणी केली. ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही खा.पडोळे यांनी दिला आहे.