
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगली आहे. भाजपकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना काँग्रेसच्या महिला आघाडीने तीव्र शब्दांत पलटवार केला आहे. ‘हा प्रकार म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत,ह्वअसा थेट आरोप काँग्रेसने केला आहे. गोंदियात शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत वंदना काळे यांनी भाजपवर सडकून टीका केली. यावेळी दिलीप बनसोड, अमर वराडे, राजेश चांदेवार, राजू काळे, विमल कटरे आदी उपस्थित होते.
वंदना काळे म्हणाल्या की, सप्टेंबर २०२३ मध्ये लोकसभा आणि राज्यसभेत महिला आरक्षणाचा प्रस्ताव एकमताने पारित झाला होता. राजकीय आरक्षणाचा पाया काँग्रेसनेच रचला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात घेण्यात आला.
महाराष्ट्रात हे आरक्षण आज ५० टक्क्यांपर्यंत वाढले आहे, हीच काँग्रेसची महिला सक्षमीकरणाची खरी ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्या पुढे म्हणाल्या की, केंद्र सरकारने २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर केले असले तरी त्याला अद्याप कायद्याचे स्वरूप देण्यात आलेले नाही. उलट या आरक्षणाच्या आडून चुकीच्या परिसीमनाचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला. त्या परिसीमनामुळे ओबीसी, अनुसूचित जाती व जमातींवर अन्याय होण्याची शक्यता होती, त्यामुळे विरोधकांनी तो डाव उधळून लावला, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसने नेहमीच महिलांना नेतृत्वाच्या केंद्रस्थानी ठेवले असल्याचे सांगताना त्यांनी उदाहरणादाखल राष्ट्रपती, मुख्यमंत्री, तसेच पक्षाध्यक्ष पदांपर्यंत महिलांना दिलेल्या संधींचा उल्लेख केला. ‘महिला सक्षमीकरण हे काँग्रेसच्या विचारसरणीचा गाभा आहे, तर भाजपकडून केवळ घोषणांचा खेळ केला जातो,’ अशी टीका त्यांनी केली. भाजपवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या की, ‘जर खरोखरच महिलांप्रती बांधिलकी असेल, तर २०२३ मध्ये पारित झालेल्या महिला आरक्षण विधेयकाला तातडीने कायद्याचे रूप द्यावे. काँग्रेस त्याचे पूर्ण समर्थन करेल. या संपूर्ण वादातून महिला आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू बनला असून, सत्ताधारी आणि विरोधकांमधील मतभेद अधिक तीव्र झाले आहेत. लोकशाहीतील महिलांच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न मात्र अद्यापही निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र या घडामोडीतून स्पष्ट होते.