
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : ताडोबा, बोर आणि पेंचसारख्या नामांकित व्याघ्र प्रकल्पांना थेट टक्कर देत भंडारा जिल्ह्यातील उमरेडकºहांडल्याच्या पवनी गेटने अल्पावधीतच स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हे पवनी गेट सध्या विदेशी पर्यटकांना अक्षरश: मोहिनी घालत आहे. हमखास होणारे व्याघ्रदर्शन, वाघिणींसह बछड्यांचे थरारक दर्शन आणि दाट, समृद्ध जंगलातील जैवविविधतेचा अनुभव यामुळे विदेशी पर्यटकांनी आपला मोर्चा वेगाने पवनी गेटकडे वळवला आहे. अवघ्या चार महिन्यांत तब्बल ५० ते ६० विदेशी पर्यटकांनी येथे वनभ्रमंती करत हमखास व्याघ्रदर्शनाचा थरार अनुभवला आहे. वाघांसोबतच बिबटे, गवा, चितळ, सांबर आदी वन्यजीवांचे सहज दर्शन घडत असल्याने या प्रवेशद्वाराची लोकप्रियता झपाट्याने वाढत असून, अल्पावधीतच पवनी गेट आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे आकर्षणकेंद्र म्हणून उदयास येत आहे.
भंडारा जिल्ह्यातील उमरेड पवनी करंडला व्याघ्र प्रकल्पातील पवनी गेट सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, त्याचे कारण म्हणजे सातत्यपूर्ण व्याघ्रदर्शन, मात्र याशिवाय आणखीन एका गोष्टीमुळे सध्या या गेटची चर्चा आहे ती म्हणजे विदेशी पर्यटकांनी याकडे वळवलेला मोर्चा. एरवी ताडोबा किंवा पेंच सारख्या व्याघ्र प्रकल्पांना पसंती देणारे विदेशी पर्यटक या उन्हाळ्यात उमरेड करंडलाच्या पवनी गेट कडे वळले आहेत. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत स्पेन, जर्मनी, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया आणि कॅनडा येथून आलेल्या सुमारे ५० ते ६० विदेशी पर्यटकांनी पवनी गेटवरील वनभ्रमंतीची निवड केली. मार्गदर्शक छगन डहारे सांगतात, ‘यंदा पवनी गेटकडे विदेशी पर्यटकांचा ओढा लक्षणीय वाढला आहे. व्याघ्रदर्शन सातत्याने होत असल्याने पर्यटक अत्यंत आनंदी होतात. त्यांचे समाधान हेच आमच्यासाठी सर्वात मोठे पारितोषिक आहे.’ त्यांच्या मते, अवघ्या चार महिन्यांत विदेशी पर्यटकांची वाढ ही या गेटच्या लोकप्रियतेचे स्पष्ट द्योतक आहे. दरम्यान, अलीकडेच अभिनेते शिवाजी साटम यांनी येथे भेट देत वनभ्रमंतीचा आनंद घेतला.