
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : प्रेमसंबंध असलेल्या वहिनीने लग्नाला नकार दिल्याने दीराने वहिनीची हत्या केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे घडली. त्यानंतर दुचाकीने पळून गेलेल्या आरोपी दीराला लाखांदूर पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीतून अटक केली. आरोपी गौरव अंबादे आणि मृत महिला माधुरी अंबादे हे दोघेही ब्रह्मपुरीचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून तिला आठ वर्षाची मुलगी आहे. दरम्यान, या महिलेचे नात्याने दीर असलेल्या गौरव अंबादे याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले.
गौरवने वहिनी माधुरीला लग्न करण्याची मागणी केली. वहिनीने लग्नास नकार दिला. त्यामुळे गौरवने दुसºया मुलीशी लग्न करण्याचे ठरवलेहोते. मात्र, जोडलेला विवाह वहिनीने तोडला आणि स्वत:ही विवाह करीत नाही, हा राग मनात पकडून गौरवने वहिनीचा भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील भागडी गावात धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केले आणि त्यानंतर उशीने तोंड दाबून हत्या केल्याची कबुली आरोपी गौरवने पोलिस तपासात कबुली दिली. घटनास्थळावरून फरार झालेल्या आरोपी गौरवला लाखांदूर पोलिसांनी ब्रम्हपुरीतून अटक केली. मृतक माधुरी तुळसीदास अंबादे या आपली मुलगी जानवी (८, रा. ब्रह्मपुरी) आणि आरोपी गौरव अंबादे (२५, रा. ब्रह्मपुरी) याच्यासह पालांदूर येथे एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. रविवारी (दि. २६) परत येताना उशीर झाल्यामुळे त्यांनी भागडी येथील नातेवाईक नाजुका गणवीर यांच्या घरी मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्याच घरी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.