
भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा -बघेडा : तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत डोंगरी बुजुर्ग येथे शासकीय निधीच्या संभाव्य गैरवापराबाबत आणि विविध प्रशासकीय अनियमिततांबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. याप्रकरणी यश दीपक कापसे यांनी दिनांक ६ मे २०२६ रोजी गट विकास अधिकारी , पंचायत समिती तुमसर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली असून त्याची प्रत जिल्हा परिषद भंडारा, जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही पाठविण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या ‘मुतारी बांधकाम’ या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित काम प्रत्यक्षात झाले नसताना केवळ कागदोपत्री दाखवून सुमारे १ लाख १५ हजार ७३४ रुपयांची रक्कम अदा करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. ही रक्कम आकाश खंगार यांच्या नावाने अदा करण्यात आली असून त्या काळात ग्रामपंचायत सचिव म्हणून विवेक भारणे कार्यरत होते, असे तक्रारीतनमूद करण्यात आले आहे. तसेच, ग्रामसभेमध्ये किंवा प्रत्यक्ष पाहणीदरम्यान संबंधित बांधकामाचे ठिकाण स्पष्ट करण्यात ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे शासकीय निधीचा अपव्यय किंवा गैरवापर झाल्याची शक्यता अधिक बळावली आहे. याशिवाय, ग्रामपंचायत कॉम्प्लेक्स संदर्भातील करार प्रक्रिया मागील पाच वर्षांपासून प्रलंबित असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तका दीर्घ कालावधी उलटूनही करार न करण्यात आल्याने महसुली नुकसान होण्याची शक्यता असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामागे निष्काळजीपणा की हेतुपुरस्सर विलंब, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारदारांनी या दोन्ही प्रकरणांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित कामांची प्रत्यक्ष पडताळणी करून अहवाल सार्वजनिक करावा आणि दोषी आढळल्यास शासकीय निधीची वसुली करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे डोंगरी बुजुर्ग ग्रामपंचायतीच्या कारभारावरप्रश्नचिन्ह निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.