
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यात पुन्हा एकदा गो-तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पिकअप व आयशर सारख्या मालवाहू वाहनांमधून मोठ्या प्रमाणात जनावरांची अवैध वाहतूक सुरू असल्याची चर्चा ग्रामीण भागात होत आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी महामार्ग व ग्रामीण मार्गांचा वापर करून ही वाहतूक केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक जनावरे कोंबून नेली जात असल्याने प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.
जिल्ह्यातील सीमावर्ती भागातून ही वाहतूक होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक व काही सामाजिक संघटनांनी पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विशेष तपास मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे. रात्रीच्या वेळी संशयित वाहनांची तपासणी वाढवून गोतस्करी रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गो-तस्करीच्या वाढत्या घटनांमुळे ग्रामीण भागात चिंता व्यक्त होत असून, संबंधित विभागांनी संयुक्त कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी जोर धरत आहे. आता संबंधित प्रशासन यावर कोणते उपाययोजना करतो, कोणत्या प्रकारे यावर आळा घालतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.