
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा तालुक्यात अवैध मुरूम उत्खनन आणि वाहतुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुरूम माफियांचे मनोबल उंचावल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील पांढराबोडी, शहापूर, जाख व सिल्ली परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध मुरूम उपसा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सदर भागात कोणतीही अधिकृत रॉयल्टी न काढता रात्रीच्या वेळी तसेच पहाटेच्या सुमारास जेसीबी आणि हायवा वाहनांच्या सहाय्याने मुरूम उपसाकेला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या प्रकारामुळे लाखो रुपयांच्या महसुलावर गदा येत असून पर्यावरणाचे देखील मोठे नुकसान होत आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, काही ठिकाणी शेतजमिनी व सरकारी जागांमधूनही मुरूम काढण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातील रस्त्यांची अवस्था खराबहोत असून धुळीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. महसूल विभाग व खनिकर्म विभागाने संयुक्त कारवाई करून अवैध मुरूम उत्खनन करणाºयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच अवैध उत्खननात वापरली जाणारी यंत्रसामग्री आणि वाहने जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.