
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गर्रा-बघेडा : तुमसर तालुक्यातील रोंगा येथील एका १९ वर्षीय युवकाचा ट्रॅक्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत युवकाचे नाव सुमित बालाराम आस्वले (वय १९, रा. रोंगा, ता. तुमसर) असे आहे. तो गावातील अमोल बोपटे यांचा ट्रॅक्टर (क्र. एमचएच३६/एसएल ०१५९) घरकुल बांधकामासाठी रेती आणण्याकरिता घेऊन गेला होता. दि. २४ मे २०२६ रोजी पहाटे ३ ते ५ वाजण्याच्या दरम्यान माडवी नदीपात्र परिसरात रेती घेऊन परत येत असताना ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला.
अपघातात सुमित हा ट्रॅक्टरच्या स्टेअरिंगमध्ये दबला गेला आणि गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत असलेल्या मजुरांनी त्याला तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी मृत युवकाचे वडील बालाराम लक्ष्मण आस्वले यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोबरवाही पोलीस स्टेशन येथे अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपासानुसार ट्रॅक्टर निष्काळजीपणे व वेगात चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. या घटनेत कोणावरही संशय नसल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गिते करीत आहेत. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे रोंगा गावात शोककळा पसरली असून युवकाच्या निधनाने गावकºयांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.