
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील कवलेवाडा येथील एका महिलेवर वानराने हल्ला केल्याने त्या रस्त्यावर पडून जबर जखमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला. संपूर्ण तिरोडा तालुक्यात वानरांची मोठी संख्या वाढली असून ह्या वानरांमुळे सतत लहान मोठे अपघात होत असून कुठल्याही यंत्रणेद्वारे यावर उपाययोजना होत नसल्याने सतत अशा घटना घडत असून ९ मे रोजी सकाळी ६ वाजता दरम्यान कवलेवाडा येथील ६५ वर्षीय महिला राधानबाई बिसेन आपले घरुन पाणी भरण्या करता निघाल्या असता त्यांचे घरासमोर असलेल्या वानराच्या कळपास हाकलण्याचा प्रयत्न केला असता एका मोठ्या वानराने त्यांच्यावर हल्ला केला.त्या हल्ल्यात महिला सिमेंट रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होवुन मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांना त्वरित तिरोडा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता आज दिनांक १० मे रोजी पहाटे ३ वाजता दरम्यान त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तिरोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास हवालदार सुनील नामूर्ती करीत आहेत.