वºहाड्यांचे वाहन उलटले, ७ जण गंभीर जखमी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : लग्न समारंभाच्या आनंदासाठी नागपूरकडे निघालेल्या वºहाड्यांच्या प्रवासावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यात घडली. तईबोथली फाट्याजवळ बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्कॉर्पिओ वाहन भीषणरीत्या उलटून सात जण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर वादळी पावसामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने जखमींवर अक्षरश: अंधारात मोबाइलच्या टॉर्च आणि वाहनांच्या हेडलाइटच्या प्रकाशात उपचार करावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, लाखांदूर तालुक्यातील बारव्हा-तई मार्गे नागपूरकडे विवाह समारंभासाठी वºहाड घेऊन जाणारी स्कॉर्पिओ (एमएच ३१ डीके २५८२) तई-बोथली फाट्याजवळ आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्यावरील तीव्र वळणावर वाहन भरधाव वेगात असल्याने स्कॉर्पिओ थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली.

अपघात इतका भीषण होता की वाहनाचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला आणि प्रवाशांमध्ये एकच आक्रोश उसळला. या अपघातात पंकज शामराव मेंढे (४५), शीतल पंकज मेंढे (४०), माधुरी ईश्वरदास भेंडारकर (५८), छाया भूपेश ब्राह्मणकर (४५), रेखा केवळराम हेमने (६३), केवळराम भदूजी हेमने (७२) आणि यशस्वी प्रकाश मेंढे (१२, सर्व रा. नागपूर) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिक आणि तई येथील युवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या जखमींना मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले. रक्तबंबाळ अवस्थेतील जखमींना तातडीने पालांदूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

मात्र, त्याचवेळी परिसरात सुरू असलेल्या वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे पालांदूर ग्रामीण रुग्णालय अक्षरश: अंधारात बुडाले होते. अशा गंभीर परिस्थितीत वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीरामे आणि त्यांच्या सहकाºयांनी हार न मानता मोबाइलच्या टॉर्च आणि चारचाकी वाहनांच्या हेडलाइटच्या प्रकाशात जखमींवर प्राथमिक उपचार सुरू केले. या प्रसंगाने उपस्थित नागरिकही हादरून गेले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अत्यावश्यक आरोग्यवाहिनीद्वारे पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथे हलविण्यात आले. दरम्यान, पालांदूर ग्रामीण रुग्णालयातील वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्येवर पुन्हा संताप व्यक्त होत आहे. गेल्या तब्बल २० महिन्यांपासून स्वतंत्र विद्युत फीडर, जनरेटर आणि इन्व्हर्टरची मागणी करण्यात येत आहे. मात्र निधीअभावी हा प्रश्न प्रलंबितच असल्याने आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य यंत्रणेला अंधारात काम करावे लागत असल्याचे भीषण वास्तव या घटनेतून समोर आले आहे. या अपघाताने लग्नाच्या आनंदावर विरजण पडले असून, ग्रामीण भागातील अपुरी आरोग्य सुविधा आणि वीज व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *