तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजुराचा दुर्दैवी मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा बघेडा : तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या मंगरली गावातील एका तेंदूपत्ता मजुराचा जंगलात झाडावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत व्यक्तीचे नाव संजय मानिकलाल धराडे (वय ४० वर्षे) असे असून ते दररोजप्रमाणे सकाळी गावालगतच्या जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते. तेंदूपत्ता तोडण्यासाठी ते झाडावर चढत असताना अचानक त्यांचा हात घसरला आणि ते खाली कोसळले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीचमृत्यू झाला.

दरम्यान, गावातीलच एक व्यक्ती तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात जात असताना संजय धराडे हे खाली पडलेल्या अवस्थेत दिसून आले. संशय आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता तो संजय असल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ ही माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली. घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गणेश बांते करीत आहेत. संजय धराडे यांच्या पश्चात आईवडील आणि सहा वर्षांची चिमुकली मुलगी असा परिवार आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. शेतमजुरी व मोलमजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत कष्ट करून संसार चालवणाºया संजय यांच्या अकाली निधनामुळे मंगरली गावावर शोककळा पसरली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *