
गडकुंभली रोड परिसरात सकाळी क्रिकेट खेळायला आलेल्या युवकांना दिसला मृतदेह ; मोटरसायकल, व बॅग घटनास्थळीच — अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांचा तपास वेगात
साकोली : शहरातील गडकुंभली रोड परिसरातील तलाव काठावर शुक्रवारी (दि.२२ मे) पहाटे एका युवकाचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृत युवकाची ओळख निखिल राजकुमार कांबळे (वय ३०, रा. मुरपार-लेंडेझरी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) अशी पटली असून, त्याच्या छातीवर, मानेवर व डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे गंभीर जखमांचे निशाण आढळले आहेत.

घटनास्थळी मृतकाची मोटरसायकल, बॅग आढळून आला असून, अज्ञात आरोपींनी निर्घृण हत्या करून मृतदेह तलाव काठावर फेकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी साकोली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.
शहरातील गडकुंभली रोड परिसरातील तलावाजवळील मैदानावर दररोजप्रमाणे शुक्रवारी सकाळी काही युवक क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. यावेळी तलावाच्या पाण्याशेजारी एका युवकाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह पडलेला दिसून आला. मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत असल्याने युवकांनी तात्काळ साकोली पोलीस ठाण्याला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत परिसराचा ताबा घेतला.
तपासादरम्यान मृतकाची ओळख निखिल राजकुमार कांबळे अशी पटली. घटनास्थळी एमएच ४० के ५०९९ क्रमांकाची मोटरसायकल, बॅग आणि अन्य साहित्य आढळून आले. मृतदेहावरील जखमांचे स्वरूप पाहता धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तलाव काठावर आणून टाकल्याची शक्यता देखील पोलिसांकडून तपासली जात आहे.

मृतक निखिल कांबळे हा मूळ सडक अर्जुनी तालुक्यातील रहिवासी असून, तो काही महिन्यांपासून साकोली येथे वास्तव्यास होता. स्थानिक पंचशील वार्डमध्ये भाड्याच्या खोलीत राहत असलेला निखिल साकोलीतील एका वाईन शॉपमध्ये सुमारे आठ हजार रुपये मासिक वेतनावर काम करीत होता. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतकावर डुगीपार पोलीस ठाण्यात बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होता आणि तो सुमारे महिनाभरापूर्वीच जामिनावर बाहेर आला होता.
दिनांक २१ मे रोजी निखिल आपल्या मूळ गावी मुरपार-लेंडेझरी येथे गेला होता. कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तो मोटरसायकलने साकोलीकडे परतण्यासाठी निघाला होता. त्याच्यासोबत पाण्याचा खाली कॅन देखील असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह तलाव परिसरात आढळल्याने जुन्या वैमनस्यातून हत्या ? केली गेली असेल अशा तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

घटनेनंतर साकोली पोलिसांनी फॉरेन्सिक पथक व श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण केले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे. मृतकाच्या हालचाली, मोबाईल संपर्क, शेवटचे लोकेशन तसेच घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंच्या आधारे तपास सुरू असून, पोलिस विविध अंगांनी तपास करीत आहेत.
दरम्यान, भरवस्तीजवळील तलाव परिसरात एवढ्या क्रूर पद्धतीने युवकाचा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. साकोली पोलिसांनी मृतकाचे वडील राजकुमार कांबळे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, आरोपींचा लवकरच छडा लावण्यात येईल, असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.